

पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील पाचोड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस गस्तीवर असलेल्या हवालदारावरांना कोयत्याचा धाक दाखवून चार अनोळखी चौंकडीने लुटमार केली. यामध्ये एक मोबाईल, सोन्याची अंगठी व नगदी तीन हजार रुपये बळजबरीने लुटून नेल्याची घटना काल (मंगळवार) रात्री पैठण ते पाचोड महामार्गावर घडली. या प्रकरणी चार अज्ञात कोयता गँगच्या चौकडी विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कडेठाण बीट परिसरात पोलिस गस्तीवर असलेले पोलीस हवलदार रवींद्र आंबेकर रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पाचोड पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी पैठण ते पाचोड मार्गावरील एका पेट्रोल पंपासमोर दोन मोटरसायकलवर चार अज्ञात व्यक्तींनी या पोलीस हवालदारांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून हवालदाराच्या हातातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व एक मोबाईल नगदी तीन हजार रुपये रोख बळजबळीने लुटून नेली.
सदरील पोलीस हवालदार यांनी या लुटमार करणाऱ्या चौकडीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सदरील कोयता गॅंग चौकडी जवळ प्राणघातक शस्त्र असल्याने सदरील हवालदारांकडील वस्तूंची लुटमार करण्याचा डाव यशस्वी करून या चौकडीने तात्काळ पलायन केले. सदरील घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना मिळाल्याने त्यांनी तालुक्यात तात्काळ वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून या कोयता गॅंग चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चार अनोळखी लुटमार करणाऱ्या चौकडी विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये कोयता गॅंगची दहशत निर्माण झाली आहे.