

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या बहुचर्चित कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणात गेले ४० दिवसांहून अधिक काळ फरार मुख्य आरोपी निदा खान हिला संभाजीनगर शहरात आश्रय देण्यात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यावरून नाशिक पोलिसांनी मतीन पटेलला आता सहआरोपी केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी निदा खानचा भाऊ एमआयएमचा कार्यकर्ता आहे. त्याची आणि नगरसेवक मतीन पटेल यांची चांगली मैत्री आहे. त्याने मतीनकडे मदत मागितली. मतीन याने त्याला संभाजीनगरला येण्यास सांगितले. मतीन यांनी संपर्कासाठी मित्राचा मोबाईल वापरला. तसेच नारेगावातील कैसर पार्क येथील एक फ्लॅट हैदराबादचे नातेवाईक राहायला येणार आहेत असे सांगून एजंटला चावी देण्यास सांगितले. शनिवारी निदा खान व अन्य संभाजीनगर शहरात आले होते.
निदाशी संबंधित एका व्यक्तीचा मोबाईल शहरात येऊन बंद झाला. मात्र, बंद होण्यापूर्वीचे शेवटचे लोकेशन नाशिक पोलिसांच्या हाती लागले. यानंतर नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी तत्काळ संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्त पवार यांनी केवळ उपायुक्त रत्नाकर नवले आणि पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली.
बॉडीगार्डशी संबंधित चौकशीच्या बहाण्याने पोलिस आयुक्तालयात मतीन पटेलला बोलावून घेतले. चार तास चौकशी केल्यानंतर निदा कैसर पार्क येथे असल्याचे पटेलने सांगताच पोलिसांनी गुरुवारी रात्री तिला बेड्या ठोकल्या.
जलील यांची एसआयटी चौकशी व्हावी- निदा खान हिला एमआयएमने साथ दिली आहे. ती एक मोरकी असून याचा मास्टरमाइंड हे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील हे आहे. त्यांनी मागे सुद्धा या प्रकरणात उघडपणे व्यक्तव्य केले होते. मुंब्रा असो, नाशिक असो की पुणे असो, या सर्वच प्रकरणात एमआयएम पुढे आली आहे. मुलींचे धर्मांतर करणे, मुलींना फसवणें, हे सर्व काही जलील यांच्या पाठिंब्यानेच होत आहे. ती छत्रपती संभाजीनगरमध्येच का आली. कारण मास्टरमाइंड येथेच राहातो. त्यामुळे जलील यांची एसआयटीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करणार आहे.
संजय शिरसाट, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर
एमआयएम निदाच्या पाठीशी- पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माझ्यावर आरोप का केले, त्यांची चीड कशामुळे आहे, हे सर्वांना माहिती आहे. जेव्हा मी मंत्री शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन चौकशी करावी, असे म्हणायला पाहिजे होते. एक मुलगी शहरात सापडते तर त्याचा संबंध इम्तियाज जलीलशी जोडला जातो. पोलिस मला जे प्रश्न विचारायचे ते विचारतील. पालकमंत्री तपासीक अधिकारी नाही. निदा निर्दोष असेल तर एमआयएम तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम