

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: उद्या धूलिवंदन म्हणजेच मनसोक्त रंगांची उधळण करत उत्साह आणि आनंदाचा सण आहे. मात्र याच उधळलेल्या किंवा चेहऱ्याला लावलेल्या रंगांनी जेव्हा भंग होतो, तेव्हा त्वचेच्या तक्रारी वाढतात. दरवर्षी होळीनंतर असे रुग्ण वाढतात. असे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे होळी खेळताना कोरडे नैसर्गिक रंग वापरावे. शरीरावर भरपूर खोबऱ्याचे तेल अथवा मॉइश्चरायझिंग लावावे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.
होळीनिमित्ताने शहरातील रंग बाजारात सजले आहे. मागील काही वर्षांत बाजारात होळीसाठी नॉन टॉक्सिक रंग उपलब्ध झालेले आहेत. हे रंग रसायनमुक्त नसतात. ते अशा घटकांपासून बनवलेले असतात जे की पाण्याचे वापराने ते त्वचेवर अगदी सहजरीत्या निघू शकतात. दुसरे म्हणजे रासायनिक आणि केमिकलयुक्त रंगांचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंग खेळायला जाताना शक्यतो अंगभर जाड कपडे घालावे. शरीराच्या उघड्या भागावर जसं की चेहरा, हात, मान यावर भरपूर प्रमाणात खोबऱ्याचे तेल अथवा मॉइश्चरायझिंग लावावे. ओठांना व नखांच्या बाजूला व्हॅसलीन लावावे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
चमकीच्या रंगांमध्ये मायका व फाइन ग्लास पावडरचा वापर केला जातो. हे रंग लावल्यास त्वचेला अतिसूक्ष्म मायक्रोइंजुरी होते. त्वचेला इजा पोहोचते केमिकल रंगामुळे त्वचेची आग होते, पुरळ येतात. त्वचेचे आजार उद्भवू शकतात. चमकीच्या रंगाचा वापर टाळावा.
धूलिवंदन हा रंगांचा सण आहे. परंतु रासायनिक रंगांमुळे दरवर्षी होळीनंतर त्वचेच्या तक्रारी घेऊन येणारे रुग्ण वाढतात. यात मुख्यतः चेहऱ्याला लावलेल्या रंगामुळे झालेल्या त्रासाच्या तक्रारींची संख्या मोठी असते. त्यामुळे होळी खेळताना त्वचेची काळजी घ्यावी.
-डॉ. आसावरी टाकळकर, त्वचारोग तज्ज्ञ
केमिकलयुक्त, चमकीचे रंग घातक असतात. त्यामुळे होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करावा. आज- काल बाजारात बरेच हर्बल व नैसर्गिक रंग मिळतात त्याचा वापर करणे चांगले आहे.
डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोग तज्ञ