

मानवत ( छत्रपती संभाजीनगर ) : परभणी जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल प्रति टन ३,२०० रुपये घोषित करण्याच्या मागणीने आता उग्र वळण घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान सोमवारी (दि. १) मध्यरात्री मोठी घटना घडली. मानवत तालुक्यातील मंगरूळ पाटी येथे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.
पाथरीहून पोखर्णीतील साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली सोमवारी मध्यरात्री दीड वाजता मंगरूळ पाटी परिसरातून जात होती. त्याच वेळी अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टरच्या हेडला आग लावली. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि तीव्रता
जिल्ह्यातील कारखानदारांकडून अद्याप ऊसाची पहिली उचल ३,२०० रुपये जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी सारंगापूर येथे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ऊस परिषदेत, ऊस दर जाहीर न झाल्यास कारखाने सुरळीत चालू देणार नाही, तसेच दर जाहीर होईपर्यंत ऊस वाहतूक रस्त्यावर आणू नये, असा कडक इशारा देण्यात आला होता. कारखानदारांनी अद्याप दर घोषित केला नसल्यामुळे आंदोलन तीव्र झाले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या मागणीसाठी वेंटीवन शुगर, सायखेडा कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दर न जाहीर केल्यास आंदोलन अधिक तीव्र
परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रशासनाने चौकशी सुरू केली असली तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना भूमिकेवर ठाम आहे. संघटनेकडून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ऊसाची पहिली उचल ३,२०० रुपये जाहीर होईपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी ऊस रस्त्यावर आणू नये. दर न जाहीर केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची चेतावणीही संघटनेने दिली आहे.