

Submit the proposal for the Chikalthana commercial complex immediately
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा येथे महापालिकेच्या माध्यमातून व्यापारी संकुल उभारण्यासाठी आवश्यक असलेला जागेचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसांत त्यास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि.१३) दिले. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला.
महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते रुंद करण्यासाठी जून व जुलै महिन्यात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती. या मोहिमेत चिकलठाणा परिसरातील मालमत्ताधारकांनी स्वयंस्फूर्तीने रस्ताबाधित बांधकामे पाडून सहकार्य केले. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी याच भागातील शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला होता.
त्याअनुषंगाने गट क्रमांक ७३७ मधील १.५७ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, संबंधित जमिनीची किंमत सुमारे ३३ कोटी रुपये असल्याने एवढ्या किमतीची जमीन देण्याचे अधिकार नसल्याचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव पुढे ढकलला व तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता.
बावणकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शनिवारी नागपूर येथून या प्रकरणात आमदार चव्हाण यांनी पुढाकार घेत महसूलमंत्री ऑनलाइन पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अनुराधा चव्हाण प्रत्यक्ष उपस्थित होत्या, तर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदी अधिकारी सहभागी झाले होते.
तातडीने प्रस्ताव सादर करा
यावेळी महसूलमंत्री बावणकुळे यांनी सार्वजनिक उपक्रमासाठी महापालिकेने जमीन मागितलेली असताना प्रस्ताव एवढे दिवस प्रलंबित का राहिला, अशी विचारणा केली. तसेच तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत मंजुरीला विलंब होणार नाही, असे स्पष्ट केले, अशी माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.