

Students prefer IT and AI for polytechnic admissions
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, यंदा विद्यार्थ्यांच्या पसंतीत मोठा बदल दिसून येत आहे. पारंपरिक शाखांऐवजी माहिती तंत्रज्ञान (आयटी), संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांना मोठी पसंती मिळत असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. किरण लाढाणे यांनी दिली.
उद्योगविश्वातील बदल, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, रोजगाराच्या नव्या संधी आणि केंद्र सरकारच्या सेमीकंडक्टर धोरणामुळे या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. देशात डिजिटल अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निकमधील आयटी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांकडे वाढला आहे.
विशेष म्हणजे दहावीनंतर तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण करून थेट उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्याची किंवा पुढे पदवी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्याची संधी असल्यामुळे अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निकची निवड करत आहेत.
विद्यार्थ्यांचा कल एआयकडे
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे सध्या जगभरातील सर्वाधिक चर्चेचे आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्याने विद्यार्थी आणि पालक दोघेही या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. अनेक पॉलिटेक्निक महाविद्यालयांनीही एआयशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केले असून, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सेमी कंडक्टर उत्पादनाला चालना
यासोबतच केंद्र सरकारने देशात सेमी कंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठे धोरण राबविले आहे. देशभरात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात असून, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच संबंधित शाखांनाही यंदा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचीही माहिती लाढाणे यांनी दिली.