

Struggle to preserve the tradition of Ganesh Mela
बबन गायकवाड
वाळूज : गणेशोत्सवाच्या दिवसात गणेश मेळ्याची कला आजच्या डिजिटल युगात अक्षरशः लोप पावत चालली आहे. मात्र अशाही स्थितीवर मात करीत मोठ्या मेहनतीने कला जोपासण्याचे काम हरहुन्नरी कलावंत निमति शाहीर डॉ. अभय संकपाळ यांनी टिकवून ठेवले आहे.
वाळूजसह परिसरात गणेश मेळा म्हटले की, शांतताप्रिय एकोप्यासह धार्मिक गुण तेवत ठेवणाऱ्यांत माजी सरपंच कै. रामकृष्ण गायकवाड यांच्या नावाचा नामोल्लेख होतो. १९७० ते ८० या काळातील ते दिवस होते.
कलेचा वारसा टिकवून ठेवण्याचे काम त्यांची तरुण पिढी आजही करीत आहे. दुष्काळातही कलेचे काम चालूच होते, हे विशेष. होय, रात्री ९ वाजता सुरू झालेले मेळ्याचे कार्यक्रम पूर्वी पहाटेपर्यंत चालायचे. त्याचे मुख्य ठिकाण गुलमंडी होते. त्यानंतर संपूर्ण शहरभर मेळे होऊन पुढे पंढरपूर-वाळूजपर्यंत मेळ्याचे आगमन चालू होते. त्यात गेल्या ४० वर्षांपासून लोकशाहीर डॉ. एम. डी. संकपाळ हे कला टिकविण्याच्या मदतीला जणू काही धावत आले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरात सर्वप्रथम संगम मेळा सुरू केला. त्यासाठी माजी खा. चंद्रकांत खैरे, गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांचे त्यावेळी चांगले सहकार्य मिळत गेले. आजच्या डिजिटल युगात मोबाईलसह टीव्हीमुळे सदरची कला टिकविणे दुरापास्त झाले आहे.
यंदा शहराचे आ. संजय केणेकर यांची त्यांना चांगली साथ मिळाली. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, विनोदी गीते, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, उत्कृष्ट शेरोशायरी सामाजप्रबोधनसह जनजागृती अनेकांची दाद मिळवून घेते.
शहरात पूर्वी असलेली पाच-सहा मेळ्यांची संख्या आता केवळ दोनवर आली आहे. त्यात भीमदर्शन मेळा तर दुसरा मोहन मेळा होय. वाढत्या महागाईचा कहरही मेळा सुरू करण्यात अडसर आणतो, असे डॉ. म्हणतात. लय भारी-करा करमणुकीची वारी... घडीभर बसा अन् पोटभर हसा... हे त्यांचे ब्रीदवाक्य गाजत आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय मिसाळ, मीना मिसाळ, गौतम आव्हाड, कैलास डोंगरदिवे, सुभाष निर्मळ आदी प्रयत्नशील आहेत.
मेळ्याचे निमति म्हणून एकेकाळी स्टेज गाजविणारे कै. अशोक पा. चिकटगावकर, कै. रूपचंद जावळे, कै. रोहन दिवेकर, कै. सायन्ना यादव, कै. एम. डी. रशीद, कै. भानुदास पंडित आदींची नावे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यानंतर कलेचा वारसा टिकविण्याच्या यादीत सुरेश गायकवाड, पी. एम. कंगले आणि डॉ. संकपाळ हे आज आघाडीवर आहेत.