

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते, चौक, वसाहती आणि उद्यानांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, भीती आणि अस्वस्थता वाढली आहे. महापालिकेने भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण मोहिमेसाठी लाखो रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या मोहिमेचा परिणाम शून्य असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या मोहिमेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या प्राणी नियंत्रण विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या शहरात तब्बल ५० हजारांहून अधिक मोकाट श्वानांचा वावर आहे. दररोज नागरिकांवर हल्ले, शाळकरी मुलांना चावे घेणे आणि रात्री वाहनधारकांना कुत्र्यांच्या टोळ्यांकडून त्रास अशा घटना वाढल्या आहेत. विशेषतः बायजीप गारखेडा, हडको, उस्मानपुरा आणि नारेगाव या भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे. गेल्या काही वर्षांत मनपाने निर्बीजीकरण मोहिमेसाठी मोठा निधी खर्च केला असून, या कामासाठी खासगी संस्थांना कंत्राट देण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांचा दावा आहे की, शेकडो श्वानांचे निर्बीजीकरण पूर्ण झाले आहे. मात्र वास्तव वेगळेच सांगते. रस्त्यांवरील श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे निर्बीजीकरण मोहीम कागदावरच मर्यादित आहे का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. अनेक नागरिकांच्या तक्रारीनुसार, मनपाचे पथक कुत्र्यांना पकडते, परंतु काही दिवसांतच ते पुन्हा त्याच भागात दिसतात. निर्बीजीकरणानंतर त्यांची हालचाल किंवा पुनरवापरावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मोहिमेचा उद्देश फोल ठरत आहे.
आश्वासन नव्हे, कृती हवी
शहरवासीय आता फक्त आश्वासनावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नाहीत. लाखो रुपये खर्चुनही रस्त्यांवरील मोकाट श्वानांचा त्रास कमी झाला नसून उलट वाढलाच आहे. त्यामुळे निर्बीजीकरण मोहीम ही फक्त दिखावा की वास्तव ? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निर्बीजीकरण मोहीम सुरू
मनपाच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट केले की, शहरातील प्रत्येक क्षेत्रात टप्प्याटप्प्याने निर्बीजीकरण मोहीम सुरू आहे. श्वानांची ओळख पटवून त्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण सातत्याने सुरू ठेवले जात आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.