

छत्रपती संभाजीनगर : लगीन घाई सुरू होती... अंगणात मांडव पडला होता, नातेवाइकांची लगबग सुरू होती आणि अवघ्या सोळा-सतरा वर्षांची ती लाडकी नवरी म्हणून सजण्याच्या तयारीत होती. पण तिला कल्पनाही नव्हती की, ज्या बोहल्यावर ती चढणार आहे, तिथे तिचे बालपण आणि स्वप्न दोन्ही कायमची कोमेजून जाणार आहेत. अशाच एका संवेदनशील क्षणी ग्रामीण पोलिसांचे दामिनी पथक देवदूतासारखे धावून आले आणि एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी होण्यापूर्वीच तिला मायेचा आधार मिळाला.
खुलताबाद जवळील देवळाना येथील नवीन कॉलनी शेतशिवार भागात २५ डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडणार असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथक प्रमुख एपीआय सरला गाडेकर यांना मिळाली होती. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दिसून आले. अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता तिचे वय १६ वर्षे ९ महिने असल्याचे निष्पन्न झाले. नात्यातीलच एका मुलाकडून मागणी आल्याने हा विवाह लावून दिला जात असल्याचे पालकांनी मान्य केले. मुलीला आता बालकल्याण समितीसमोर हजर करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सरला गाडेकर, दिलीप साळवे, कपिल बनकर, भाग्यश्री चव्हाण, शीतल क्षीरसागर, चाईल्डलाईनचे सचिन दौड आणि खुलताबाद ठाण्याचे एएसआय वारे यांनी केली.
ज्या हातात पुस्तके, त्या हातात संसाराची धुरा नको
दामिनी पथक आणि चाईल्डलाईनचे समुपदेशक सचिन दौड यांनी पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. बालविवाह करणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी २ वर्षे सक्तमजुरी आणि २ लाख रुपये दंडाची तरतूद असल्याचे त्यांनी पालकांना समजावून सांगितले. तसेच ज्या हातात पुस्तके असायला हवीत, त्या हातात संसाराची धुरा नको; ज्या वयात तिने स्वप्न पाहायची, त्या वयात तिच्यावर मातृत्व नको, या शब्दांत जेव्हा समुपदेशन केल्यानंतर पालकांनी आपली चूक मान्य केली. मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचे लग्न लावणार नाही, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले.