

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दहा महिन्यांत चोरीला गेलेले, हरवलेले, रिक्षा, बसमध्ये विसरून राहिलेले नागरिकांचे १०१ मोबाईल पोलिसांनी परत मिळवून दिले. मंगळवारी (दि.१७) डीसीपी प्रशांत स्वामी यांच्या हस्ते फिर्यादींना मोबाईल परत देताच त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
अधिक माहितीनुसार, सिडको हद्दीत विविध ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल हरवले, रिक्षा, बसमध्ये विसरून राहिले कोणाचे चोरी झाले अशा विविध तक्रारी गेल्या दहा महिन्यांत दाखल आहेत. मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी अधिकारी, अंमलदारांना सूचना केल्या. सातत्याने मोबाईल सायबर पोलिसांच्या मदतीने ट्रेसिंगवर टाकण्यात आले. तांत्रिक तपास करून सायबर पोलिसांनी माहिती सिडको ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी मोबाईल वापरकरत्र्यांना संपर्क करून ते परत मागवून घेतले. मंगळवारी १०१ मोबाईल ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, कामगार, नोकरदार विविध क्षेत्रांतील नागरिकांना परत करण्यात आले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी मनोज पगारे, सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पीए-सआय अनिल नाणेकर, हरिदास मैदाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, जमादार मंगेश पवार, अंमलदार सहदेव साबळे, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, अमोल अंभोरे यांनी केली.
अन्य शहरांसह परराज्यातून परत मिळविले
सिडकोच्या विशेष पथकाने काही मोबाईल शहर, ग्रामीण, जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, अहिल्यानगर येथे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन परत आणले. तर काही मोबाईल हे उत्तरप्रदेश, गुजरात, झारखंड, बिहार राज्यातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळविण्यात आले.
दिवंगत पतीने भेट दिलेला मोबाईल मिळाला परत
सिडको एन-८ येथील आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने मोबाईल भेट दिला होता. त्यांच्या पतीची ती शेवटी आठवण होती. तो गहाळ झाल्याने महिलेने परत मिळेल याची आशा सोडली होती. मात्र, तिच्या हातात मोबाईल देताच डोळे भरून आले. अतिशय भावुक होऊन तिने पोलिसांचे आभार मानले.