

छत्रपती संभाजीनगर : जालना येथील स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्याने नाशिकच्या दुकानदारांकडून जमा करून आणलेले २७ लाखांची रोकड असलेली बॅग कार चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकुन, चाकूने वार करून लुटण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यू श्रेयनगर, उस्मानपुरा भागात घडली. भरदिवसा घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी दिनेश राधेशाम साबू (४५, रा. मंगल धाम स्वर संगम सोसायटी, न्यू श्रेयनगर) यांच्या तक्रारीनुसार, ते जालना येथील एका नामांकित स्टील कंपनीत नोकरी करतात. त्यांनी सोमवारी नाशिक येथून विविध दुकानदारांकडून २७ लाख ५ हजार ९१० रुपये जमा करून रात्री घरी परतले होते. सकाळी कंपनीत पैसे घेऊन जाण्यासाठी ते तयार झाले. त्यांच्या कारचा चालक गणेश ओंकारराव शिंदे (४८, रा. बदनापूर) हा सकाळी दहाच्या सुमारास साबू यांना घेण्यासाठी आला. त्यांनी शिंदेच्या हातात २७लाखांची रोकड असलेली पिशवी देऊन गाडीमध्ये ठेवण्यास सांगितले. साबू हे जेवणाच डबा घेण्यासाठी घरात गेले.
थोड्यावेळात शिंदे याच्या ओरडण्याचा आवाज आला. साबू यांनी बाहेर येऊन पहिले तर शिंदे जखमी झालेला दिसला. विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की, कारमध्ये पैशाची पिशवी ठेवत ठेवण्यासाठी दरवाजा उघडताच चेहरा झाकून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोळ्यात मिरची पूड टाकून कटरने हातावर वार करून जखमी केले. त्यानंतर पैशाची पिशवी घेऊन पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी उस्मानपुरा पोलिसांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनीही पाहणी करून सूचना केल्या. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.