

छत्रपती संभाजीनगर : सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस अपघातांचे प्रमाण जरी किरकोळ असले तरी एप्रिल ते नोव्हेंबर-२०२५ या आठ महिन्यांत सुमारे ९७अपघात झाल्याची नोंद महामंडळात आहे. तर यादरम्यान अपघातातील नुकसान भरपाईपोटी सुमारे ३ कोटी २२ लाख रुपयांचे वितरण केले आहे. ही रक्कम याच अपघातांतील भरपाई नसून, मागील अपघातांतीलही यात भरपाईची रक्कम नमूद आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली.
गेल्या आठ महिन्यांत ९७अपघातांपैकी ३८ अपघात गंभीर स्वरूपाचे झाले आहे. या अपघातांत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ५२ जण किरकोळ जखमी झलेले आहेत. अनेकदा मागून येऊन धडकणाऱ्या वाहनधारकांलाही इजा झाल्यास महामंडळालाच नुकसान भरपाई द्यावी लागते. अशाही अपघाताची यात नोंद आहे. मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये पादचारी तसेच दुचाकीस्वार असल्याचीही माहिती समोर आली आहे. प्रत्येक महिन्याला एसटीचे साधारण दीड अपघात होतात, अशीही माहितीही सूत्रांकडून मिळाली. ३ कोटींची नुकसान भरपाई अपघातांतील नुकसानीबाबत एसटी महामंडळाने २०२५ मध्ये ३ कोटी २२ लाखांचे वितरण केले आहे. यात मृत, जखमी, किंवा मालमत्तेचे नुकसान अशी भरपाई करून दिली आहे. यात अनेकदान एसटीची चूक नसतानाही समोरील वाहनधारकाला नुकसान भरपाई देण्याची वेळ एसटी महामंडळावर येते. त्यामुळे नुकसान भरपाईचा आकडा फुगलेला दिसत आहे.
चालकांचे समुपदेशन
चालकांकडून विनाअपघात सेवेची अपेक्षा एसटी महामंडळाला आहे. त्यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते. वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारी आहे. सुरक्षित वाहन चालविणे ही एसटीच्या चालकांबरोबरच इतर वाहनधारकांचीही आहे. असे झाले तर अपघात कमी होतील, अशीही माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली.