

ST: 230 centers in the district for smart cards
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीतून विविध वर्गातील प्रवाशांना पूर्ण मोफत तसेच ५० टक्क्यांची सवलत देण्यात येते. यांना आता स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी जिल्ह्यात २३० केंद्र देण्यात आली असून, पाच केंद्रांतून नोंदणीला सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांत सिडको बसस्थानकात सुमारे २३० जणांनी नोंदणी केल्याची माहिती आगार प्रमुख नीलिमा इसे यांनी दिली.
एसटीच्या वतीने विविध वर्गवारीतील प्रवाशांना प्रवासात विशेष सूट देण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, माजी सैनिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्याधिग्रस्त, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व इतर सवलतीधारक प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एन.सी.एम.सी.) अनिवार्य करण्यात आले आहे.
या कार्डासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात २३० केंद्रांतून व्यवस्था करण्यात आली आहे. आज घडीला मुख्य बसस्थानक, सिडको बसस्थानकासह कन्नड, सिल्लोड, गंगापूर आदी पाच ठिकाणच्या केंद्रांवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
२३० जणांची नोंदणी
स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी सिडको बसस्थानकाने पुढाकार घेतला असून, या दोन दिवसांत येथे २३० सवलतधारकांची नोंदणी केली आहे. इतर ठिकाणची संख्या अद्याप प्राप्त झाली नसून, लवकरच त्या ठिकाणच्या नोंदणीचा आकडा समोर येणार आहे. जिल्ह्यातील इतर केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. जे सेंटर सुरू आहेत, त्या सेंटरवर सवलतधारक नोंदणी करण्यासाठी गर्दी करत आहेत. एकंदर स्मार्ट कार्डच्या नोंदणीला वेग आला आहे.