

SIT term ends, Shalarth's investigation is incomplete
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी नियुक्त विशेष चौकशी पथकाला (एसआयटी) दिलेली मुदत ७ मार्च रोजी संपली. मात्र, अजूनही शालार्थ आयडी प्रकरणांची चौकशी पूर्ण झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर विभागात एसआयटीचे पथक डिसेंबर अखेरपासून एकेका कागदपत्रांची छाननी करत आहे. आतापर्यंत विभागातील चौदा हजार प्रकरणापैकी सुमारे ११ हजार प्रकरणांचीच तपासणी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात नागपूरसह काही ठिकाणी शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला होता. त्यात असंख्य अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून वेतन अदा करण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण विभागातील अनेक बरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली.
राज्यातील इतर भागात अशा प्रकारचे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी शासनदरबारी प्राप्त झाल्याने शासनाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली. हे पथक राज्यातील विविध भागात जाऊन तपासणी करत आहे.
सुरूवातीला या पथकाला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु या मुदतीत काम न झाल्याने त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. मात्र, आता ही मुदतही ७ मार्च रोजी संपली आहे. परंतु अद्यापही तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही.
एसआयटीचे कर्मचारी डिसेंबर अखेरपासून छत्रपती संभाजीनगर विभागात शालार्थ आयडीच्या एकेका प्रकरणाची तपासणी करत आहेत. आतापर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या १० हजार ६० प्रकरणांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय शिक्षण मंडळानेही २०१९ ते २०२५ या कालावधीत ४ हजार ७५ शालार्थ आयडी दिलेले आहेत. आतापर्यंत त्यातील १ हजार प्रकरणांची तपासणी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनातही दिले शालार्थ आयडी
राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्यात अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मराठवाडयात बीड, लातूर अशा अनेक जिल्ह्यातही शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिली गेल्याच्या तक्रार दाखल झालेल्या आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू नव्हत्या. कार्यालयांसाठीही कोर-ोना काळात निबंध होते. तरीही विभागात मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
एसआयटीकडून सर्व अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करण्याचे काम केली जात आहे. सन २०१९ ते २०२५ या काळातील प्रकरणांची तपासणी केली जात आहे. सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयात बसून एसआयटीचे कर्मचारी तपासणी करत आहेत.