

Sillod's hunger strike ends on eighth day
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा येथील तहसीलसमोर सुरू असलेले आमरण उपोषण आठव्या दिवशी सोमवारी (दि. ६) मंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीनंतर सुटले. मंगेश साबळे यांच्या मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी अतुल सावे यांनी दिले. त्यानंतर मंगेश साबळे यांनी उपोषण सोडले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे यांचे सोमवारपासून (दि. २९) आमरण उपोषण सुरू होते. शुक्रवारी (दि. ३) उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी यांनी मंगेश साबळे यांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. तर लतीफ पठाण यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिला होता. शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाईल, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र यानंतरही मंगेश साबळे उपोषणावर ठाम राहिले. तर त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी धरणे, शनिवारी रास्ता रोको तर रविवारी शहर बंद ठेवत आंदोलने केली होती. उपोषणाला तालुक्यातील शेकडो शेतकरी, महिला, विविध पक्ष, संघटनांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता.
सोमवारी दुपारी मंत्री अतुल सावे यांनी मंगेश साबळे यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ व कर्जमाफी करावी, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदेश सचिव सुरेश बनकर, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, किसान मोर्चाचे मकरंद कोरडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, एकनाथ हिवाळे, शुभम अन्वीकर, नारायण बडक, संजय बडक, भाऊसाहेब बडक आदी उपस्थित होते. दरम्यान सोमवारी सकाळी किसान मोर्चाचे महामंत्री मकरंद कोरडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून उपो-षणाची माहिती दिली होती.
उपोषणकर्ते मंगेश साबळे यांनी उपोषण मागे घेताना आमचा विश्वासघात करू नका, अशी साद मंत्री अतुल सावे यांना घातली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून बळीराजाला भरघोस मदत करा, अशी मागणी केली. आठवडाभरात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. तर मग पुन्हा आंदोलनाचे हत्यार काढावे लागेल, असा इशारा मंगेश साबळे यांनी यावेळी दिला.