

सिल्लोड : तालुक्यातील शिवना, भराडी, कासोद या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा स्थापनेची मागणी या भागातील शिवप्रेमी जनतेने वेळोवेळी केलेली आहे. या तिनही गावामध्ये पुतळे उभारले जाणार आहेत. यासाठी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले. शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या प्रस्ताव प्रशासनाकडे दिला होता. या प्रस्तावास अखेर शासनाच्या कला संचालनालय विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे शिवरायांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, आ.अब्दुल सत्तार यांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
समिती व ग्रामपंचायतीला चबुतरा उभारणी करण्यासाठी वास्तुविशारदच्या परवानगी आवश्यक असून त्यासाठी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात पुतळे उभारण्यास सुरुवात होईल. वरील गावांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.