

Shortage of urea fertilizer in Sillod, Soygaon
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
सिल्लोड सोयगाव तालुक्यात युरिया खतांचा होणार तुटवडा पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी आवश्यक तेवढे युरिया खताचा साठा उपलब्ध करून द्यावे. तसेच लिंकिंगची सक्ती करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही तहसीलदारांना देत तहसीलदार सतीश सोनी यांच्याशी चर्चाही केली.
यासंदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी आयुक्त पुणे, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले आहेत. दरम्यान या संदर्भात उचित कारवाई व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही कळविले असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यात मका पीक प्राधान्याने घेतल्या जाते, त्यामुळे युरिया खताची मागणी अधिक आहे. मंजूर मात्रानुसार युरिया खत कमी मिळाल्याचे समजते. ही तफावत लक्षात घेता शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पीक लागवडीसाठी आवश्यक तेवढे खते वेळेवर उपलब्ध व्हावेत. तसेच खत विक्रेत्यांकडून लिंकिंगची सक्ती केल्या जात असल्यामुळे याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कार्यवाही व्हावी. सदर प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देऊन खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांचा तुटवडा भासणार नाही याची दखल घ्यावी. खतांच्या लिंकिंगची सक्ती करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना युरिया व इतर खते उपलब्ध करून देण्यास आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी आयुक्त व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरीप हंगामामुळे खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे केल्या होत्या. त्याअनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याशी चर्चा करून याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र दिले.