

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवस शिवाजीनगर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे आदेश शहर वाहतूक शाखेने काढले असून, शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शनिवारी (दि.८) आणि रविवारी (दि.९) असे सलग दोन दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरूनच ये-जा करावी लागणार आहे.
सातारा देवळाईकरांसाठी महत्त्वाचा असलेला शिवाजीनगर भुयारी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत तयार करण्यात आला. या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असतानाच त्याचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्याच पावसात भुयारी मार्गाला गळती लागली. पावसाचे पाणी साचल्याने हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. त्यानंतरही भुयारी मार्गात पाणी साचत त्यातून मार्ग काढताना वाहने घसरून अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले. तरीही या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या भुयारी मार्गात पाणी साचलेले आहे. त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, देवळाई चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी नवीन पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी रस्ता दुरुस्तीचे काम अद्यापही बाकी आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शिवाजीनगर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गातून वाहनधारकांना देवळाई चौकाकडे जाता येणार नसल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा वापर म्हणून संग्रामनगर उड्डाणपूल, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल, एमआयटी चौक महुनगर टी पॉइंटमार्गे उस्मानपुरामार्गे वाहनध-असल्याने ारकांना ये-जा करावी लागणार आहे.