

पैठण : पुढारी वृत्तसेवा
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्या प्रकरणातील संशयित गुन्हेगार वाल्मीक कराडसह इतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पैठण शहरातील बस स्थानक चौकात आज (बुधवार) दि.५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून वाल्मीक कराडच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करून संतोष देशमुख यांचा छळ करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मारेकऱ्यांना व प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड याला फाशी देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने पैठण शहरातील बस स्थानक चौकात बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी संशयित गुन्हेगार वाल्मीक कराड याच्या फोटोला जोडे मारून त्याच्या पुतळ्याला आग लावून दहन करण्यात आले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र मापारी, शहर प्रमुख तुषार पाटील, किशोर चौधरी, महिला आघाडी प्रमुख ज्योती काकडे, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, नामदेव खरात, माजी नगरसेवक भूषण कावसानकर, संतोष सव्वाशे, वडवळेचे सरपंच किशोर काळे, चेअरमन शाम काळे, बाळू माने, सुनील हिंगे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलन प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोना नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, मनोज वैद्य, दिलवाले यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता