

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अर्थात शिवसेना ठाकरे गटात ज्येष्ठ नेते माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यातील सर्वश्रृत वाद उफळून आला. निमित्त ठरले ते एका मेळाव्याच्या निमंत्रणाचे. या मेळाव्यासाठी आमंत्रित न केल्याने संतापलेल्या खैरेंनी दानवेंवर तोफ डागली. ‘तो’ काड्या करतो, त्याने शिवसेना संपविली, मला लोकसभेत पाडण्यासाठी ‘सुपारी’ घेतली, अशा कठोर शब्दांत त्यांनी दानवेंविरोधातील आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली.
ते इथेच थांबले नाहीत, तर थेट मातोश्रीवर जाऊन दानवेंची तक्रार केली. तेव्हा मातोश्रीनेही पुन्हा एकदा खैरेंची पक्षाप्रति असलेली श्रद्धा अन् दानवेंची पक्षाला असलेली गरज यापोटी दोघांनाही ‘सबुरी’चा सल्ला दिला आणि पुन्हा एकदा तात्पुरता वादावर पडदा टाकला. गेल्या दहा वर्षांपासून असाच खेळ सुरू आहे. उद्धव सेनचे हे दोन्ही ‘सेनापती’ विरोधी पक्षावर कुरघोडी करण्याऐवजी एकमेकांवरच कुरघोडी करतात... विषय मातोश्रीवर जातो... पुन्हा त्यांच्यात समेट घडतो... मात्र, दोन सेनापतींमधील बालिशपणाच्या या भांडणात घुसमट सच्च्या शिवसैनिकांची अन् वाट पक्षाची लागली आहे, हे खुद्द मातोश्रीच्याही अद्याप कसे लक्षात येत नाही? हाच खरा प्रश्न आहे.
तसे पाहिले तर छत्रपती संभाजीनगर हा मुंबईनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेला मुंबईनंतर सर्वाधिक प्रेम मिळाले ते येथूनच. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढली, फोफावली ती येथूनच. नुकतीच पार पडलेली विधानसभा आणि लोकसभा सोडली तर गेली तीन दशके शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, मनपा असो की गावागावांतील ग्रामपंचायती. बहुतांश ठिकाणी शिवसेनेचाच भगवा फडकायचा. मात्र, संभाजीनगरने तीन दशक शिवसेनेला जसे प्रेम भरभरून दिले, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर तितक्याच भरभरून जखमाही दिल्या. या बंडात जिल्ह्यातील सहापैकीं पाच आमदारांनी उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकला. राज्यात शिवसेनेचे एकगठ्ठा सर्वाधिक नुकसान याच जिल्ह्यातून झाले. पक्ष सोडताना या स्थानिक आमदारांनी खापर जरी मातोश्रीवर फोडले असले तरी त्यांच्या ‘वैतागाचे’ खरे मूळ होते ते म्हणजे हाच ‘खैरे आणि दानवे’ वाद, हे कुणीही नाकारू शकत नाही. जवळपास अडीच दशक केवळ संभाजीनगरच नाही तर संपूर्ण मराठवाड्याची सूत्र खैरेंच्याच हाती होती. कळत-नकळत पक्षाचे इतके अधिकार खैरेंकडे सोपविले होते की, पक्षात खैरे सांगतील तीच पूर्व दिशा, अशी संभाजीनगरात तरी परिस्थिती होती. एकप्रकारे त्यांची एकाधिकारशाहीच झाली होती, असे जुने सैनिक सांगतात. अंबादास दानवे शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये पक्षाच्या कार्यक्रमांच्या मॅनेजमेंटमधून मातोश्रीवर आपली वेगळीच छाप पाडली. परिणामी, आपसुक खैरेंच्या पक्षातील वर्चस्वाला हादरा बसला. तेव्हापासूनच खैरे आणि दानवे यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खैरे आणि दानवे यांनी यापूर्वीही अनेकदा एकमेकांवर जाहीर टीका केल्या आहेत; परंतु पक्षाने कधीच दोघांना रोखले नाही. त्यामुळे निष्ठावान सच्च्या शिवसैनिकांची गटबाजीच्या या राजकारणात घुसमट सुरू होती. याची बाजू घ्यावी तर त्याच्याकडून त्रास आणि त्याच्या बाजूने जावे तर याच्याकडून त्रास... अशा कोंडीत पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक अडकलेले होते. बर या दोन्ही नेत्यांशिवाय वर दुसर्या कुणाचे ऐकूनही घेतले जात नसायचे. अशा या स्थितीत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले अन् खैरे-दानवे वादामुळे पक्षात गुदमरलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिकांना पर्याय मिळाला. दोन्ही नेत्यांच्या गटबाजीला वैतागलेल्या आमदारांसह हजारो शिवसैनिकांनी आपल्या भावनांना ‘वाट’ मोकळी करून देत ‘जय महाराष्ट्र’ केला. या पक्षफुटीनंतर राज्यात उद्धव सेनेची सर्वात दयनीय अवस्था संभाजीनगरात झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजघडीला बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी उद्धवसेनेकडे उरले आहेत. आपल्या वादात पक्षाची ‘वाट’ लागली, हे माहीत असतानाही अद्याप या दोघांमधील कुरघोडीचे राजकारण संपायला तयार नाही. गेल्याच आठवड्यात त्याचा पुन्हा प्रत्यय आला. दोघांनीही जाहीरपणे एकमेकांवर टीका केल्या. पक्षाने पुन्हा दोघांनाही गोंजारले.
आज खरे तर उद्धवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शिंदेसेना, भाजप या त्यांच्या शत्रूचा नेटाने मुकाबला करण्याची गरज आहे; परंतु खैरे आणि दानवे हे दोन सेनापती विरोधकांऐवजी आपआपसातच कुरघोडी करण्यात मग्न आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धवसेनेने या दोन्ही नेत्यांना आताच लगाम घातला नाही तर खरोखरच येणार्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विरोधक म्हणतात त्याप्रमाणे संभाजीनगरात उद्धवसेनेला उमेदवार मिळणेही मुश्किल होऊन बसेल.