

वैजापूर : नितीन थोरात
तालुक्यातील शिऊर बंगला येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सात ते आठ दुकाने जळून खाक झाल्याची मोठी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आगीत पान स्टॉल, नाष्टा हॉटेल, मोटर गॅरेज तसेच इतर छोट्या व्यावसायिक दुकानांचा समावेश आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच तिने संपूर्ण दुकानांना वेढा घातला. त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाकडून बचावकार्यही सुरू असून आग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किट की अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी अनेक दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अद्यापही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नसून धुराचे मोठे लोट परिसरात पसरले आहेत. प्रशासन, पोलीस आणि अग्निशामक विभाग घटनास्थळी तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.