छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून जाणार्या शक्तिपीठ महामार्गाला आता विरोध वाढत चालला आहे. मंगळवारी मराठवाड्यात ठिकठिकाणी या महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला. लातूर, परभणीत जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना संतप्त शेतकर्यांनी पिटाळून लावले. आमच्या जमिनी हेच आमच्या पोटापाण्याचे एकमेव साधन आहे, ते आम्ही हिरावू देणार नाही, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला. नांदेड- हिंगोली मार्गावर अर्धा तास रास्ता रोको झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
लातूर तालुक्यातील ढोकी (येळी) येथे मंगळवारी मोजणीसाठी महसूल खात्याचे पथक आले होते. लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे-विरोळे या आपल्या पथकासह गावात पोहोचल्या. परंतु पथक पोहोचण्यापूर्वीच मोठ्या संख्येने ढोकी व परिसरातील अनेक गावांतील शेतकरी एकत्र जमले होते. त्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत होते. शक्तिपीठ मार्ग रद्द करा, असा मजकूर लिहिलेल्या टोप्या त्यांनी परिधान केल्या होत्या. आमच्या कायम उपजीविकेचे साधन शेती हेच आहे. येथील शेतकरी अल्प अथवा अत्यल्प भूधारक आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी या महामार्गासाठी देणार नाही, असे सांगत त्यांनी उपविभागीय अधिकार्यांना त्याबाबत निवेदनही दिले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. शेतकर्यांच्या नकारामुळे पथक परतले.
दरम्यान लातूर जिल्ह्यातून ज्या ज्या गावातून शक्तिपीठ महामार्ग नियोजित आहे, अशा सर्व गावांतील सर्व संबंधित शेतकर्यांना मोजणीसंदर्भात नोटीस दिल्या आहेत. त्यांना तारखाही दिल्या आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही मोजणी करणारच असल्याचे विरोळे यांनी सांगितले.
पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्ग मोजणी कार्यक्रम मंगळवारी दुपारी उधळून लावला. पिंपळगाव बाळापूर,नाव की, कात्नेश्वर,आहेर वाडी, संदलापूर,सुरवाडी गावशिवारातून जाणार्या बहुचर्चित व वादग्रस्त ठरलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठीची मोजणी करण्यासाठी सकाळी 11 वाजता भूमिअभिलेख अधिकारी, महसूल खात्याचे तलाठी, मंडळ अधिकारी हे मोठ्या पोलिस फौजफाट्यासह आले असता असंख्य संतप्त झालेल्या पुरुष महिला शेतकर्यांनी मोजणी कार्यक्रम होऊ दिला नाही.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव व आसपासच्या परिसरातील शेतकर्यांनी दोन तासांहून अधिक काळ महामार्ग रोखला. या आंदोलनाला शेतकरी नेत्यांसह आणि भाजपेत्तर पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. आता एकच जिद्द - शक्तिपीठ रद्द, असा निर्धार या आंदोलनातून करण्यात आला.अंबाजोगाई, परळी तालुक्यांतही शेतकर्यांनी रास्ता रोको केला. सरकारने महामार्ग रद्द न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेने दिला.
कळमनुरी तालुक्यामधील नऊ गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. नांदेड हिंगोली महामार्गावर भाटेगाव येथे रस्ता रोको करून शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने मार्ग रद्द करण्यासाठी तहसीलदार जीवथ कुमार कांबळे यांना निवेदन दिले. या परिसरातील नऊ गावांतील 147 शेतकर्यांची 735 एकर बागायती जमीन जात असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही शेतकरी मंगळवारी रस्त्यावर उतरले.सकाळी सांगली येथे खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वात अंकली चौक येथे शेतकर्यांनी महामार्ग रोखून धरला. भरपावसात रास्ता रोको करण्यात आला. सरकारच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर कोल्हापूर येथे शिरोळी पंचगंगा पुलावर भरपावसात ठिय्या मांडत शेतकर्यांनी पुणे-बंगळूर महामार्ग तीन तास रोखून धरला.