

Scan and get information on safe tourism.
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा-वेरूळसह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी मधमाशांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित व हरित पर्यटनाचा संदेश देणाऱ्या विशेष क्यूआर कोडचे विमोचन महाराष्ट्र भाजप अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्या हस्ते सिल्लोड येथे करण्यात आले.
पर्यटनस्थळांवरील बस, हॉटेल्स आणि लेणी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे स्टिकर लावण्यात येणार असून, क्यूआर कोड स्कॅन करताच पर्यटकांना मधमाशांपासून बचाव, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती उपलब्ध होणार आहे.
सोयगाव वन विभागाच्या मानव-वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य तसेच अभिनव प्रतिष्ठानचे वन्यजीव अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी ही संकल्पना विकसित केली आहे. अजिंठा लेणी परिसरात सातत्याने घडणाऱ्या मधमाशांच्या हल्ल्यांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्याचा पर्यटनावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विमोचनप्रसंगी अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पवार, सूर्यकिरण अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सरव्यवस्थापक विजय चव्हाण, अरुण राठोड आणि स्वराज डापके उपस्थित होते.
यावेळी डॉ. संतोष पाटील म्हणाले, मधमाशा या निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून परागीभवन आणि फलन प्रक्रियेत त्यांची भूमिका अनन्यसाधारण आहे. मात्र मानवाच्या काही निष्काळजी सवयींमुळे त्या आक्रमक होतात. डंख केल्यानंतर मधमाशीचाही मृत्यू होतो. त्यामुळे हा हल्ला आत्मघातकी ठरतो. निसर्गाशी सुसंवाद साधत हरित पर्यटनाची सवय आपण लावली पाहिजे.
इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून हे क्यूआर. स्टिकर्स हॉटेल्स, बसस्थानके आणि लेणी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनीदेखील लेणी परिसरात जागोजागी जनजागृतीपर पोस्टर्स लावून पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.
सुवासिक अत्तर, स्प्रेचा वापर टाळावा
पर्यटकांनी भडक रंगाचे कपडे, तीव्र सुवासिक अत्तर, स्प्रे यांचा वापर टाळावा. मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत. निसर्ग आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करत सुरक्षित पर्यटनाला सर्वांनी सहकार्य करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन इद्रीस मुलतानी यांनी केले.