

कन्नड : तालुक्यातील आठही महसूल मंडळांत सुरुवातीलाच मृग नक्षत्राने समाधानकारक हजेरी लावली. खरीप पिकासाठी कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार 97 हजार 357 हेक्टर क्षेत्रापैकी मृग नक्षत्राच्या पावसावर तालुक्यातील शेतकर्यांनी 30 हजार 731 हेक्टर खरिपाची पेरणी 21 जूनपर्यंत पूर्ण केली होती. समाधानकारक पावसामुळे आतापर्यंत तालुक्यात एकूण 80 हजार हेक्टरवर 85 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
तालुक्यात कापूस लागवडीचे सरासरी 46 हजार हेक्टर इतके क्षेत्र असते, मात्र यावर्षी कापसाच्या क्षेत्रात 10 ते 15 टक्क्यांनी घट होऊन 25 हजार हेक्टर वर शेतकर्यांनी कापसाची लागवड केली आहे. तर दरवर्षी सरासरी मकाची लागवड 34 हजार हेक्टरवर लागवड असते, मात्र मकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा कापसा ऐवजी तालुक्यात मकाचा पेरा वाढून तो सरासरी 50 हजार हेक्टरवर गेला असल्याचे कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या अहवालानुसार लक्षात येते.
पेरणी आणि लागवड पूर्ण झालेल्या खरीपाच्या पिकासाठी आवश्यक असणारा असा काहीसा पाऊस देखील देखील तालुक्यात सुरू असल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या अखेरीस केवळ 45 हजार हेक्टर वर खरीपाची पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र 27 जून पर्यंतच 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असून या आठवड्यात जवळपास शंभर टक्के पेरण्या तालुक्यात पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून चांगला पाऊस झाल्याने शिवना, गांधारी, पूर्णा या नद्यासह छोटया मोठ्या नाल्यांना पूर आल्याने धरणातील पाणी साठ्या वाढ होण्यास मदत होत आहे.
कन्नड - 144. 4 मी. मी. चापानेर - 156.8 मिमी, देवगाव रंगारी - 82.1 मिमी चिखलठाण - 156.8 मिमी पिशोर - 205.3 मिमी, नाचनवेल - 167.9 मिमी चिंचोली लि. - 219.9 मिमी करंजखेड - 216.1 मिमी नागद - 127.7 तालुक्यात आतापर्यंत एकूण 164.1 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने 85 टक्के इतकी पेरणी झाली आहे. तालुक्यात मकाचे क्षेत्र सरासरीपेक्षा वाढले असून, कापूस पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.
संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी