

Sant Dnyaneshwar Garden in Paithan set for a makeover.
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठणच्या पर्यटनाचा सुवर्णकाळ पुन्हा परतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकेकाळी देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करणारे संत ज्ञानेश्वर उद्यान आता नव्या रूपात उमे राहण्याच्या तयारीत असून, तब्बल १३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामुळे या उद्यानाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.
पर्यटनाला नवसंजीवनी मिळावी यासाठी आमदार विलास भुमरे यांच्या पुढाकारातून पर्यटन विभागाकडून १३२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
उद्यान हे केवळ पर्यटनस्थळ न राहता मनोरंजन, संस्कृती आणि रोजगाराचे केंद्र होणार असल्याचे आमदार विलास भुमरे म्हणाले. जायकवाडी धरण उभारल्यानंतर परिसरात पर्यटन वाढावे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने १९७० मध्ये १२५ हेक्टर क्षेत्रावर संत ज्ञानेश्वर उद्यान साकारण्यात आले.
देश-विदेशांतून पर्यटक उद्यान बघण्यासाठी येत होते. जागतिक दर्जाचे उद्यान झाले पाहिजे यासाठी आमदार विलास भुमरे यांनी शासनदरबारी प्रयत्न केल्यामुळे पर्यटन विभागाच्या माध्यमातून १४९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, यापैकी १३२ कोटींचे टेंडर होऊन पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.
गुरुवारी उद्यानात आमदार विलास भुमरे यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी कार्यकारी अभियंता गणेश हासे पंचायत समितीची सभापती विनोद बोंबले, उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे, शाखा अभियंता मंगेश शेलार, तुषार विसपुते, नगरसेवक शेखर शिंदे, जालिंदर अडसूळ, प्रा संतोष गव्हाणे, रमेश शेळके, पवन लोहिया, अॅड. प्रवीण निवारे, गणेश बोंबले, सतीश आंधळे, नामदेव खरात, शहादेव लोहारे, किशोर चौधरी यांच्यासह कंत्राटदारचे सुपरवायझर घुगे, अनिकेत धारकर यांची यावेळी उपस्थिती होती.
उद्यान परिसराला कंपाऊंड, दिव्य दर्शनीगेट (कमान), पैठणी हटमध्ये विविध दुकाने, प्रदर्शनी हॉल, आठ प्रकारचे थीम उद्यान, ट्राय ट्रेन, जांभुळवण परिसरात दुकाने आदी कामे होणार आहेत. दरम्यान, अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कंत्राटदाराकडून दर्जेदार कामे करून घेतली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी सांगितले.