

पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील दांडगा रांजणगाव परिसरात असलेल्या गल्हाटी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करताना पाचोड पोलिसांनी कारवाई करून ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण तालुक्यात दांडगा रांजणगाव परिसरात गल्हाटी नदीत वाळू तस्करांकडून अवैधरित्या वाळू तस्करी सुरू असल्याची गोपनीय खबर पाचोड पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सपोनि शरदचंद्र रोडगे, पोना फिरोज नादर बर्डे यांनी गल्हाटी नदीच्या परिसरात सापळा लावला. तेंव्हा त्यांना या ठिकाणी अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार आढळून आला.
सदरील पोलीस पथकाने वाळू तस्करी करीत असलेले ट्रॅक्टर पकडून वाळू परवाना संदर्भात माहिती घेतले असता यावेळी चालकाकडं कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्याने वाळूसह ट्रॅक्टर जप्त करून भागवत रघुनाथ तळपे, महेश एकनाथ पवार, साईनाथ आप्पासाहेब तळपे सर्व रा. कडेठाण ता. पैठण यांच्यावर वाळू तस्करी प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.