

छ्त्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात बुधवारी रात्री वाळूमाफियांनी तहसीलदारांच्या पथकावर हल्ला केला. वाळूमाफियांनी पथकाच्या वाहनावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी बुधवारी रात्री पथक गस्तीवर होते. यावेळी सिल्लोडमधील उपळी येथील चौफुलीवर काहीजण अवैधरित्या ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करीत असताना आढळून आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही जणांनी ज्वलनशील पदार्थ तहसीलदारांच्या वाहनावर फेकून समोरील काचेवर दगड मारत ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. यावेळी वाहनात मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांच्यासह सह तलाठी, तहसीलदार यांचे अंगरक्षक व वाहन चालक असे नऊ जण होते. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.