

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना नव्या 2500 मि.मी व्यासाच्या जलवाहिनीतून पहिल्या टप्प्यात 200 एमएलडी पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक महिन्याला कामाचा आढावा घेतात. परंतु, असे असतानाही नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभांदरम्यान टाकण्यात आलेल्या वितरण वाहिन्यांमधील गॅप जोडणीचे काम सहा महिन्यांपासून जैसे थेच आहे.
अजूनही 2000, 1500 आणि 1100 मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांवर तब्बल 2 ते 4 किलो मीटरपर्यंतचे गॅप जोडणी बाकी आहे. त्यामुळे पाणी शहरात येणारच नसेल तर नागरिकांना वितरित करणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरवासीयांना दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अमृत योजनेतून 2740 कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेच्या कामाचा शुभारंभ 2020 साली झाला. परंतु, काम प्रत्यक्षात 2021 साली सुरू झाले. आज 5 वर्षे पूर्ण होऊनही या योजनेतून शहराला एक थेंबही वाढीव पाणी उपलब्ध झालेले नाहीत.
त्यात दोन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वीचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु, कंत्राटदार कंपनीकडून अद्यापही धिम्या गतीनेच काम करण्यात येत आहे. शहरात जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यात आले. त्यासोबतच कमी दाबाने पाणी सोडून जलवाहिनीची पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासण्यात आली.
दरम्यान, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी दाखल झाल्याने लवकरच शहरात पाणी आणण्यात येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातून डोंगरावर उभारलेल्या उंच टाक्यांमध्ये पाणी नेण्यात येईल. परंतु, हे पाणी शहरात आणण्यासाठी नक्षत्रवाडी डोंगराहून जलकुंभांपर्यंत ज्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या त्यातील 1500 मि.मी., 1100 मि.मी. आणि 2000 मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांमध्ये ठिकठिकाणी गॅप जोडणीचे काम शिल्लक आहे.
हे काम मागील सहा महिन्यांपासून जैसे थेच आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अद्याप कंत्राटदार कंपनीकडून या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केलेले नाहीत. उंच जलकुंभात पाणी येऊनही पुरवठा कसे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1500 च्या जलवाहिनीवर गॅप
या 1500 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून नक्षत्रवाडीच्या उंच जलकुंभाहून शहरातील जलकुंभांमध्ये पाणी आणले जाणार आहे. हे पाणी सध्या वापरात असलेले 6 जलकुंभात येईल. ज्यामध्ये हर्सूल जेल, हरिसिद्धी माता, एन 7, एन-6 चे आर 1, आर 2, एन-5 यांचा समावेश आहे. परंतु, या जलकुंभांना जोडणार्या जलवाहिनीवर 6 ठिकाणी प्रत्येकी 211 मीटरचे गॅप आहेत. तर नव्याने तयार झालेल्या हिमायत बाग, टीव्ही सेंटर, मिसारवाडी, हर्सूल या चार जलकुंभांना जोडणार्या जलवाहिनीवर 81 मीटर लांबीचे प्रत्येकी 3 गॅप आहेत, असे एकूण 2.25 किलो मीटरचे गॅप आहेत.
2000 च्या जलवाहिनीवर गॅप
या जलवाहिनीवर सध्या कार्यान्वित असलेले 3 जलकुंभ आहेत. यात शिवाजीनगर 1, शिवाजीनगर 2 आणि पुंडलिकनगर यांचा समावेश आहे. तर नव्या जलकुंभांमध्ये पारिजातनगर, शिवाजी ग््रााऊंड, केटली गार्डन, हरिओमनगर, नारेगाव असे एकूण 8 जलकुंभांवर एकूण 4.3 किलो मीटरचे गॅप जोडणी शिल्लक आहे.