

छत्रपती संभाजीनगर : शहरात घरफोड्या, चोऱ्या आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांनी अगोदरच उच्छाद मांडला असताना, आता पुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा थेट मुख्य रस्त्यावरील व्यावसाविक संकुलांकडे वळवला आहे. शहरातील गजबजलेल्या जालना रोडवरील नुपूर सिनेमा कॉम्प्लेक्समधील तब्बल चार दुकाने सोमवारी (दि. ४) मध्यरात्री फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांच्या या वाढत्या धाडसामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अॅड. सतीश फकीरचंद गाजरे (३३, रा. चिकलठाणा) यांच्या फिर्यादीनुसार, सेव्हनहिल जवळ नुपूर सिनेमा कॉम्प्लेक्समधील शॉप नं. १ मध्ये सुनील अग्रवाल यांचे यशोदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि अॅड. गाजरे यांचे वकिली व्यवसायाचे कार्यालय आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कार्यालय बंद करून घरी गेले होते. मंगळवारी सकाळी एका मित्राने फोन करून त्यांच्या कार्यालयाचे कुलूप तुटल्याची माहिती दिली.
या माहितीनंतर अॅड. गाजरे यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली असता, दुकानाचे शटर उचकटलेले दिसले, चोरट्यांनी कार्यालयातील केबिनचे कुलूप तोडून ड्रॉव्हरमध्ये ठेव लेली २ हजार रुपयांची रोकड लांबवल्याचे समोर आले. यासोबतच चोरट्यांनी शॉप नं. ७ मधील डॉ. रमेश जैन यांचे साई रिअल इस्टेट हे दुकानही फोडले असून, तेथून ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याशिवाय, याच कॉम्प्लेक्समधील मास्टर यश कॅटरर्स आणि वेदांत राजहंस ट्रॅव्हल्स ही दुकानेही फोडण्यात आली. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्याने रिकाम्या हाताने पोबारा केला. त्यामुळे या दुकानांच्या मालकांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले.