

Sambhajinagar Political News: BJP celebrates Bihar victory in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाला यश मिळाले आहे. शुक्रवारी (दि.१४) निकाल जाहीर होताच शहर भाजप कार्यकारिणीच्या वतीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटून विजयी जल्लोष साजरा केला. यात महिला मोर्चाचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
यावेळी राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, माजी महापौर भगवान घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला.
जनतेने पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजप व मित्र पक्षाकडे सत्ता दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरही निकालाचा परिणाम दिसणार आहे. त्यामुळे शहर भाजप कार्यकारिणीच्या वतीने बिहार विजयाचा जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. क्रांती चौकात शहर कार्यकारणीने मिठाई वाटप करून विजयाच्या जयघोषणाने परिसर दणाणून टाकला.
यावेळी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जल्ल-ोषात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. यावेळी सविता कुलकर्णी, डॉ. उज्ज्वला दहिफळे, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड, शेख हफिस, योगेश वाणी, छाया खाजेकर, गीता आचार्य, अमृता पादोलकर, शालिनी बुंधे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री सावे, खासदार कराड यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला. तसेच फटक्यांची आतषबाजी करण्यात येऊन मिठाईचे वाटप करण्यात आले.