

चाकूर ( छत्रपती संभाजीनगर ) : तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे (वय ३५) हे गावातील वीजदिवा सुरळीत करण्यासाठी पोलावर चढून बल्ब बसवत असताना, अचानक विजेचा तीव्र शॉक बसून पोलावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. क्षणभरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण चापोली गावात शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, सूर्यकांत यांचा विवाह १२ डिसेंबर रोजी ठरलेला होता. विवाहाच्या काही दिवसांपूर्वीच मृत्यूने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूर्यकांत हे वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर चापोली ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून गेली दोन वर्षे कार्यरत होते. मंगळवारी सकाळी गावातील एका पोलवर बल्ब बसविताना त्यांना शॉक बसला आणि ते खाली कोसळले. कर्तव्य बजावतानाच त्यांचा मृत्यू झाला. शव रुग्णालयात हलविल्यानंतर तेथे नातेवाईकांनी जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला.