

Sambhajinagar News: Take Action Against Speeding Sand Trucks
तळणी, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या गाड्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तळणी येथील व्यापारी, ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात पोलिस उपनिरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन बीट अंमलदार रखमाजी मुंडे यांनी स्वीकारले. त्यात म्हटले, की वाळू वाहतुकीच्या गाड्यांच्या कर्कश्य हॉर्नने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्णा नदीपात्रातून होत असलेल्या या वाळू उपशामुळे तळणी बस स्टैंड परिसरातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव गाड्या जात असल्याने धुळीचासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास संबंधित व्यापाऱ्याला होत आहे.
तळणी बसस्थानक परिसरात नेहमी गर्दी असते. या परिसरात वेग नियंत्रणात असणे गरजेचे आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने या वाहनचालकांना कायदेशीर कारवाई करावी नसता व्यापारी महासंघ लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन सरकटे यांनी दिला आहे. यावेळी सरपंच गौतम सदावर्ते, नितीन सरकटे, विनायक राठोड, अशोक राठोड, अशोक सरकटे आदींची उपस्थिती होती.