

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहर विकासाच्या नावाखाली जुन्या-नव्या विकास आराखड्याचा हवाला देत पाडापाडीची मोहीम राबविली. यात परवानगी नसलेली बेकायदा बांधकामेच पाडण्यात आल्याचा खुलासाही प्रशासनाने केला. मात्र, पाडापाडी केल्यानंतर बाधित मालमत्तांचा मलबाही उचलावा लागतो, हेच महापालिकेचे अधिकारी विसरल्याने महिना उलटूनही काही रस्त्यांवर अजूनही हा मलबा तसाच पडून आहे.
शहर विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद असणे आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमानुसार कारवाई करणे गरजेचे असते. तसे न करता प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने मोहीम राबविली. त्यावरून आयुक्त व त्यांच्या टीमविरोधात शहरवासीयांचा संतापाची लाट पसरली असून कारवाईविरोधात अनेकांनी मोर्चे व आंदोलने केली आहे. गावठाण, झोपडपट्टीच्या नियमांची अक्षरशः पायमल्लीच करण्यात आल्याचेही या मोहिमेत दिसून आले. अखेर बाधित मालमत्ताधारकांनी स्थानिक मंत्री आणि आमदारांविरोधात घोषणाबाजी केल्याने महापालिकेला कारवाई थांबवावी लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे चंपा चौक ते जालना रोड आणि हर्मूल रस्त्याच्या कारवाई विरोधात सर्वाधिक ओरड झाल्याने सध्या कारवाई थंडावली आहे.
दरम्यान, ४ जून ते ६ ऑगस्ट अशी दोन महिने महापालिकेने शहरातील पाच प्रमुख आणि एका अंतर्गत रस्त्यांवर पाडापाडीची मोहीम राबविली. यात प्रशासनाने तब्बल ४ हजार ८९१ मालमत्तांचा (ज्यामध्ये दुकान, घरे, खासगी संस्थांची कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, शाळा, लघु उद्योग, टपऱ्या, शेड) समावेश आहे.
ज्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने ही मोहीम राबविली. त्या रस्त्यावर या बाधित मालमत्तांचा मलबा दोन महिने उलटूनही तसाच पडून आहे. तो उचलणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. काही बाधित मालमत्ताधारकांनी आपापल्या घरासमोरील मलबा हटवला. मात्र, अजूनही बराच खच पडून आहे. हा सिमेंट आणि विटांचा खच सध्या पावसामुळे रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
महापालिकेच्या कारवाईला प्रचंड विरोध झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी बैठक घेत खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई करावी, अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर महापालिकेने घोषणा, कागदपत्रांची तपासणी, मोजणी, मार्किंग आणि ७ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावणे, अशी प्रक्रिया हसूलमध्ये राबविली.
बाबा पंप ते मोंढा नाका- १८०
मोंढा नाका ते सेव्हनहिल-२२९
केंब्रीज शाळा चौक ते चिकलठाणा-४९०
मुकुंदवाडी ते चिकलठाणा-२२९
चिकलठाणा ते एपीआय कॉर्नर-६४५
बीड बायपास ते देवळाई चौक-३५७
नक्षत्रवाडी ते रेल्वेस्टेशन रोड-३६२
महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी-४७७
पडेगाव ते मिटमिटा-५८५
शरणापूर फाटा ते पडेगाव रोड-२७२
दिल्लीगेट ते हसूल टी पाइंट रोड-२४५
हसूल टी पाइंट-आंबेडकरनगर-सिडको चौक-४४५
नारेगाव भवानी चौक ते नारेगाव कचरा डेपो