

Sambhajinagar News : Ban on talking on mobile phones in municipal hall
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना नगरसेवकांनी मोबाईलवर बोलू नये, अशी मागणी भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी सभेच्या प्रारंभी केली. त्याची दखल घेत महापौरांनी सभागृहात मोबाईलवर बोलण्यास स्पष्ट मनाई केली. अत्यावश्यक संभाषण असल्यास सभागृहाबाहेर जाऊन बोलावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही काही नगरसेवक मोबाईलवर बोलताना दिसल्याने सभागृहातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. विशेष म्हणजे, मोबाईलवर बोलण्यास बंदी घालण्याची मागणी करणारे सदस्यही नंतर मोबाईलवर संभाषण करताना दिसल्याने या प्रकाराची सभागृहातच चर्चा रंगली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामे, विविध प्रकल्प, धोरणात्मक निर्णय तसेच प्रशासनाकडून मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावांवर चर्चा होते. सदस्यांच्या सूचना आणि हरकती यावेळी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे सभेचे कामकाज सुरू असताना प्रत्येक नगरसेवकाने चर्चेकडे लक्ष देणे अपेक्षित असते.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सभेच्या सुरुवातीलाच भाजप नगरसेवक दांडगे यांनी मोबाईलवर बोलणाऱ्या सदस्यांबाबत मुद्दा उपस्थित केला. सभागृहात मोबाईलवर संभाषण करण्यास मनाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर महापौरांनी सर्व सदस्यांना मोबाईलवर बोलू नये, असे निर्देश दिले. अत्यावश्यक फोन असल्यास सभागृहाबाहेर जाऊन संभाषण करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महापौरांच्या सूचनेनंतर काही वेळातच सभागृहात मोबाईलवर बोलणारे नगरसेवक दिसून आले- काही सदस्य मोठ्याने संभाषण करीत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे सभागृहातील शिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
नियमाची मागणी करणारे सदस्यच मोबाईलवर
मोबाईल वापराबाबत बंदीची मागणी करण्यात आली आणि महापौरांनी आदेशही दिले. मात्र, आदेशानंतरही मोबाईलवरील संभाषणे सुरूच राहिली. विशेष म्हणजे, नियमाची मागणी करणारे सदस्यच मोबाईलवर बोलताना दिसल्याने सभागृहातील शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले-