

Sambhajinagar News: Appointments of Municipal Corporation Nominated Members Challenged in Court
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेतील : पक्षनिहाय नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांच्या नियुक्त्यांभोवती आता न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या दहा नियुक्त्यांविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. आशा बिनवडे यांनी निवडणूक याचिका दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिकेत पक्षीय तौलनिक संख्येनुसार नुकतीच दहा जणांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यात भाजपकडून ५, एमआयएमचे ३ तर शिंदेसेना १ उबाठाकडून १ असे दहा जणांची निवड करण्यात आली आहे. आता या निवडीला न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेची दखल घेत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (कॉर्पोरेशन कोर्ट) एन. एच. तिखे यांनी संबंधित सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. बिनवडे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिका क्रमांक २०/२०२६ मध्ये २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूच नेद्वारे करण्यात आलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महाराष्ट्र याचिकेनुसार, महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच पात्रता व नियुक्ती नियम २०१२ मधील नियम ४ व ५ चे पालन न करता ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे संबंधित नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात तत्कालीन मनपा आयुक्त जी. श्रीकांत, नगरसचिव नंदकिशोर भोंबे आणि दहा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने संबंधित सर्वांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
बिनवडे यांचा अर्ज डावलल्याची चर्चा
भाजपकडून दहा वर्षे नगरसेविका राहिलेल्या डॉ. आशा बिनवडे यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केला होता. मात्र पक्ष संघटनेत सक्रिय नसल्याचे कारण देत त्यांच्या अर्जाचा विचार झाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नियुक्ती प्रक्रियेत निकषांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप घेत त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावल्याचे बोलले जात आहे.
राजकीय पक्षांच्या भुमिकेकडे लक्ष
स्वीकृत दहा सदस्यांच्या विर-ोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षात पुढे काय होणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जर या सदस्यांचे सदस्यत्व रदद्द झाले तर राजकीय पक्ष यापुढे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.