

अजिंठा: महाविद्यालयात जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत कारमध्ये बसवून फर्दापूर (ता. सोयगाव ) येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कारासह गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१) सकाळी सुमारे आठच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थिनी महाविद्यालयाकडे जात असताना शिवना येथील कृष्णा माणिकराव काळे (२५ ) याने तिचा मार्ग अडवला. त्याने तुझ्या वडिलांना जिवंत मारून टाकीन अशी धमकी देत जबरदस्तीने तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला फर्दापूर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित मुलीने वारंवार विरोध केला परंतु वडिलांना जीवे मारण्याच्या धमकीमुळे ती घाबरली होती. शनिवारी महाविद्यालय सुटण्याच्या वेळेनंतर घरी आल्यानंतर तिने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने अजिंठा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी कृष्णा काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षक एम.एम. सुडके करीत आहेत.