Sambhajinagar Protest | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाचनवेल-पाचोरा मार्गावर रास्ता रोको

सकल मराठा समाज नाचनवेल विभागाचे आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
 Nachanvel Pachora Road Block Maratha Reservation Demand
Nachanvel Pachora Road Block Maratha Reservation DemandPudhari
Published on
Updated on

Nachanvel Pachora Road Block Maratha Reservation Demand

पिशोर : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत नाचनवेल विभागातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नाचनवेल चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

नाचनवेल चौफुलीवरून जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक ४८ वरील कन्नड, सिल्लोड, फुलंब्री व पाचोरा या प्रमुख मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांनी घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

 Nachanvel Pachora Road Block Maratha Reservation Demand
Maratha Reservation Beed : जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 60 आंदोलकांवर बीड, आष्टीमध्ये गुन्हे दाखल

रास्ता रोको आंदोलनादरम्यान मराठा मावळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी समाज एकजुटीने लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.

चिमुकल्यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन

सकल मराठा समाज, नाचनवेल विभागाच्या वतीने चिमुकल्यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मंडळ अधिकारी विकास वाघ, पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, तलाठी सतीश बनकर तसेच तलाठी संगिता सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात मराठा समाजाला आरक्षण देण्यासह समाजाच्या इतर मागण्या शासनाने मान्य कराव्यात, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 Nachanvel Pachora Road Block Maratha Reservation Demand
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी बीड जिल्हा कडकडीत बंद

पोलिसांचा चोख बंदोबस्त

रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पिशोर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाचनवेल बीट जमादार परमेश्वर दराडे, पोलीस नाईक करण म्हस्के, कौतिक सपकाळ, पंढरीनाथ इगळे तसेच होमगार्ड यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नाचनवेल परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाज नाचनवेल विभागाच्या वतीने करण्यात आली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news