Sambhajinagar Crime | अनधिकृत खते व जैव उत्प्रेरकांचा ३८ हजारांचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Unauthorized fertilizers seized Kannad
कन्नड : कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने तालुक्यात कारवाई करत अनधिकृतरीत्या विक्रीसाठी ठेवलेला खते व जैव उत्प्रेरकांचा ३८ हजार ४५८ रुपयांचा साठा जप्त केला असून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २४ फेब्रुवारी रोजी कृषी संचालक अशोक किरन्नाळी (पुणे), विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख (कृषी आयुक्तालय, पुणे) तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तथा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने डमी ग्राहकामार्फत खत विक्रीची खात्री केली. त्यानंतर वासडी येथील श्री गणेश मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानात छापा टाकण्यात आला. येथे रामा अॅग्रोटेक प्रा. लि., बारामती (जि. पुणे) कंपनीचे खते व जैव उत्प्रेरकांची ‘मिरची स्पेशल किट’ अनधिकृतरीत्या विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान रामा अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनीचा जैव उत्प्रेरक उत्पादनासाठी आवश्यक असलेला जी–२ परवाना कालबाह्य झालेला असतानाही उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच कन्नड येथील स्वामिनी कृषी सेवा केंद्राचे रामेश्वर बारगळ यांनी परवाना नसलेल्या जैव उत्प्रेरकांची बेकायदेशीर विक्री श्री गणेश मोबाईल शॉपीमार्फत केल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीकृष्ण बंडगर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रवींद्र उराडे (वैजापूर) तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश राठोड व ज्ञानेश्वर खिल्लारे (कन्नड) यांनी सहभाग नोंदविला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, येथील कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज सैंदाणे यांच्या फिर्यादीनुसार पिशोर पोलीस ठाण्यात मोबाईल दुकानाचे मालक गणेश शिंदे, स्वामिनी कृषी सेवा केंद्राचे रामेश्वर बारगळ व रामा अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनीचे मालक रामदास विठ्ठल चव्हाण यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, स्वामिनी कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी दिली.

