

छत्रपती संभाजीनगर: लाखो रूपये शुल्क भरूनही संस्थेने परिक्षेचे हॉल तिकीट दिले नाही. परिणामी गुरुवारी (दि.4) सकाळी सुरू झालेल्या एमसीए प्रथम वर्षाच्या परिक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागले. श्री साई इन्स्टिट्यूटच्या शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यांच्या वादात विद्यार्थी मात्र भरडले गेले. वर्ष वाया जात असल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.
श्री साई इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च या संस्थेचे कॉलेज सिडको आंबेडकरनगर- मिसारवाडी भागात आहे. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या जवळपास 120 विद्यार्थ्यांनी लाखो रूपये शुल्क भरले. गुरुवारी सकाळी 10 वाजता एमसीए प्रथम वर्षाची परिक्षा होती. त्यासाठी कालपासूनच विद्यार्थी हॉल तिकीटसाठी संस्थेच्या कार्यालयात ठाण मांडून होते. मात्र विद्यापीठाने परिक्षेचे हॉल तिकीट दिलेच नाही, असे सांगत संस्थेने हात झटकले. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले. सकाळी 7 वाजेपासूनच शेकडो विद्यार्थी संस्थेच्या कार्यालयासमोर जमले होते. मात्र संस्थाचालक आणि शिक्षक कार्यालयाला कुलूप लावून गायब झाले. विद्यार्थ्यासह पालकांनी संस्थेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
माहितीनुसार, विद्यापीठ आणि सदर संस्थेच्या वादाचे प्रकरण कोर्टात आहे. काल (दि.३ डिसेंबर) रात्री उशीरा न्यायालयाच्या आदेशाने काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले. मात्र एमसीएच्या जवळपास 100 हून अधिक विद्यार्थ्यांबाबत संस्थेने विद्यापीठाकडूनच हॉल तिकीट आले नाही असे सांगत हात वर केले. संस्था आणि विद्यापीठ यांच्या वादात शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
दरम्यान, श्री साई इन्स्टिट्यूट संस्थेला या विद्यार्थ्यांनी लाखो रूपये शुल्क भरले. परिक्षेच्या हॉल तिकीटसाठी 1420 रूपयेही जमा केले. मात्र संस्थेने हॉल तिकीटच दिले नाही. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे संस्थेने विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाकडे जमा केले नाही, असाही आरोप होत आहे.
या वादात संस्थेशी संपर्क साधला असता कुणीही बोलायला तयार नाही. दुसरीकडे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख डोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या महाविद्यालयाला परवानगी नाही. तरीही हा प्रश्न अकडामिक असल्याने संबधित विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. या बाबत प्र.कुलगुरू वाल्मिक सरोदे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सकाळी परिक्षा असल्याने विद्यार्थी हॉल तिकीटसाठी संस्थेच्या कार्यालयावर गेले मात्र तिथे कुलूप पाहून विद्यार्थ्यांसह पालकही संतप्त झाले. त्यांनी थेट सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. ठाण्यात गेल्यावरही पोलिस अधिकारी गायब असल्याचे दिसून आले.