

छत्रपती संभाजीनगर : गट हौसिंग प्रकल्पाच्या नावाखाली करोडो रुपयांचा अनधिकृत व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीच्या नावावरील अधिकारपत्र वैध असल्याचे भासवून करार करण्यात आला. तसेच बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे फ्लॅट विक्री करून सुमारे ७ कोटी रुपयांचा अपहार केला. हा प्रकार १३ नोव्हेंबर २०२० ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान सातारा परिसरात घडला. या प्रकरणी प्रदीप मधुकर पाटील (रा. कासलीवाल मार्वल, दिशानगरी, बीड बायपास, सातारा), प्रमोद मधुकर पाटील आणि लौकिक प्रमोद पाटील यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ सूर्यकांत आहिरे (२६, रा. उज्ज्वल रेसिडेन्सी, गोविंदनगर, नाशिक) यांचे एक फर्म आहे. त्यांची मध्यस्थींमार्फत आरोपी प्रदीप पाटील यांच्याशी ओळख झाली. पाटीलने सातारा परिसरातील १८ इमारतींचा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे आमिष दाखवत २ कोटी रुपये नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेतले.
यावेळी प्रकल्प मूळ वाल्मीक निखाडे यांचा असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी २००६ मध्ये दिलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र निखाडे यांचे २०१० मध्ये निधन झालेले असताना त्याच अधिकारपत्राचा वापर करून व्यवहार केल्याचे समोर आले.
करार करूनही कोट्यवधींची थकबाकी
पाटील याने १८ इमारतींचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आहिरे यांच्याकडून २ कोटी रुपये घेतले. मात्र काम पूर्ण करूनही पैसे परत दिले नाही काही रक्कम परत करून कोट्यवधी रुपये बाकीच ठेवले. दरम्यान गुरू योगानंद हौसिंग सोसायटीचे चेअरमन मोहन ठाकरे यांनी करारनाम्यावरील सह्या आपल्या नसल्याचे सांगितले. आरोपींनी स्वतःला चेअरमन दाखवून बनावट सह्या करून करारनामे केल्याचे आहिरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
फ्लॅट विक्रीतून ७ कोटी
आहिरेच्या पैशांतून बांधलेल्या इमारतीतील फ्लॅट्स पाटील यांनी स्वतःला सोसायटीचे पदाधिकारी दाख-वून विकले. बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे व्यवहार करून सुमारे ७ कोटी रुपयांचा अपहार केला. मात्र या पैकी एकही रुपया बांधकामदाराला देण्यात आला नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांनाही फटका
१५ ते २० पोलिस कर्मचारी तसेच १०० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी फ्लॅटसाठी पैसे भरले, मात्र त्यांना ताबा मिळालेला नाही. अनेकांनी नोकरीच्या कारणास्तव तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले. तसेच प्रकल्पात सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांचे देखील ६० ते ७० लाख रुपये अडकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक निर्मला राख करीत आहेत. आर्थिक व्यवहार, बँक नोंदी आणि करारनाम्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच संबंधित सोसायट्यांच्या कामकाजाचीही पडताळणी सुरू आहे.