

Sambhajinagar Encroachment Campaign News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने जालना रस्त्यावर ठिकठिकणी मनमानीपणेच मोहीम राबविली आहे. यात काही ठिकाणी मोहीम केवळ नावासाठीच होती, तर काही ठिकाणी संपूर्ण बांधकामच जमीनदोस्त करेपर्यंत पथक जागचे हलले नाही. एवढेच काय तर विरोध करणाऱ्यांना पोलिस आयुक्त, मनपा आयुक्तांनी खंडपीठाचे आदेश दाखवत दम दिला अन् थोडाही वेळ न देता बांधकामे पाडून टाकली.
सेव्हनहिल ते एपीआय कॉर्नरपर्यंतच काय तर बाबा पंप ते केंद्रीज या संपूर्ण रस्त्यावर धनदांडग्यांना बांधकाम स्वतःहुन काढून घेण्यासाठी वेळ दिला. तेव्हा हा दुजाभाव नेमका कशासाठी, हा न्यायालयाचा अवमान नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरात महापालिकेने रस्ते रुंदीकरणाआड असलेल्या मालमत्तांवर बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या. यात उंच इमारतींचाही समावेश आहे. परंतु या बांधकामापैकी सुमारे ८० टक्के इमारती आणि दुकाने, कार्यालये, घरे ही मध्यवर्गीय आणि गरिबांचीच आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली, असे सांगणयात येत आहे. एवढेच नव्हे तर केंब्रीज ते सेव्हनहिल या ६० मीटरमध्ये येणारी सर्व बांधकामे पाडण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्तांनी विशेष अधिकाराचा वापर करून अगदी गावठाण आणि अधिकृत झोपडपट्टीतील घरेही पाडली. हे न्यायालयाच्या आदेशाचे अवमान नाही का? तसेच गरिबांची घरे पाडणाऱ्या प्रशासक जी. श्रीकांत यांनी जलना रोडवरील काही मालमत्ताधारकांवर विशेष प्रेम दाखवत अनेकांना स्वतःहून बाधकाम काढून घेण्यासाठी वेळ दिला.
दरम्यान महापालिकेच्या सर्वसामान्य नागरीकांना वेगळा आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय या भूमिकेमुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. मनपाच्या या दुटप्पी धोरणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मोंढा नाका ते क्रांती चौक उ ाणपुलादरम्यान दोन्ही बाजूंनी रस्त्याची रुंदी ४५ मीटर आहे. त्याआड येणारी सर्व बांधकामे काढण्यात आली. जालना रोडवर एवढीच कारवाई नियमानुसार पूर्ण केली.
चिकलठाणा विमानतळापासून पुढे दोन्ही बाजूंना दुभाजकापासून ३०-३० मीटर रुंद रस्ता आहे. यामध्ये येणारी सर्व बांधकामे ही महापालिकेने बेकायदाच ठरवली आहेत. असे असतानाही या रस्त्यावर महापालिकेने मुकुंदवाडीमध्ये सामान्य व्यावसाविकांची दुकाने, हटिल्स जमीनदोस्त केली. परंतु तेथून पुढे असलेल्या एका बड्या हॉटेलची साधी वॉलकंपाऊंडच काय तर त्यालगत सुरू असलेला मुख्य उपसाठी महापालिकेला रोखता आला नाही. मग हा महापालिकेलचा दुजाभाव नाही का?
केंब्रीज ते चिकलठाणा विमानतळादरम्यान महापालिकेने विशेष अधिकार राबवत ६० मीटर रस्त्याआड येणारी बांधकामे जमीनदोस्त केली. प्रत्यक्षात यातील काही परिसर हा गावठाणमध्ये मोडतो. मात्र असे असतानाही वेळ न देता मोजणी करून लागलीच पाडापाडी केली. का तर हे सर्व मालमत्ताधारक सामान्य आहेत अन् तेथून पुढेच असलेल्या धनदांडग्यांना गोंजारले. चिकलठाणा गावापासून पुढे काही अंतरावरच भले मोठे बॉल कंपाऊंड आहे. त्यापुढे दोन भल्या मोठ्या व्यावसायिक इमारती आहेत. हे तिन्ही बांधकामे पाडण्याचे धाडस महापालिकेने दाखविले नाही. मग यांच्यासाठी विशेष अधिकार नाहीत का?
जालना रोडवर क्रांती चौकाहून बाबा पंपाकडे जाताना जिल्हा सत्र न्यायालय आहे. न्यायालयाने रस्ता रुंदीकरणाआड येणारी स्वतःची संरक्षण भिंत मागे घेत नवीन संरक्षण भिंत बांधली आहे. या कामाला सुमारे चार वर्षे होत आहेत अन् त्यालगतच एका कार शोरूमच्या व्यावसायिकाने मागील अडीच वर्षांमध्ये आपल्या शोरूमची संरक्षण चिंत मागे घेतली नाही अन् असे असतानाही महापालिकेने आता त्याला काढून घेण्यासाठी सपशेल वेळ दिला.
सेव्हनहिल ते मोंढा नाका यादरम्यान महापालिकेने बहुतांश बांधकामे नियमाप्रमाणे काढली. परंतु ऐन सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली मोंळ्याकडे जाताना जे पत्र्याशे शेड आहे, ते काढण्याची हिम्मत मनपाने केली नाही.