

Sambhajinagar Encroachment Campaign News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव माहिमेत गोर-गरीब, सर्वसामान्यांना आताच्या आता चल उठ, असे दरडावत महापालिका त्यांच्या घर, दुकानांवर बुलडोजर चालवत आहे. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी धनदांडगे, व्यापारी, उद्योजकांच्या मालमत्तांना मात्र सवलत देताना दिसून येत आहेत.
बुधवारी पैठण रोडवर आणि गुरुवारी (दि.१०) जालना रोडवरही मनपाचा असा दुजाभाव स्पष्ट दिसून आला. कारवाईदरम्यान सामान्यांची छोटी छोटी दुकाने, टपऱ्या तात्काळ जमीनदोस्त करण्यात आल्या. तर काही धनदांडग्यांना त्याचे साहित्य काढून घेण्यासाठी तास-दोन तासांची मुदत देण्यात आली तर काहींना सात दिवसांचा अवधी देण्यात आला. मनपाच्या या भेदभावपूर्ण कारवाईवावत नागरिकांमध्ये प्रचड संताप खदखदत आहे.
मनपाकडून शहरात गेल्या महिनाभरापासून अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. या माहिमेला मुकुंदवाडी येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर केंब्रिज चौक, चिकलठाणा, हसूल, जळगाव रोड, सिडको, कांचनवाडी, नक्षत्रवाडी ते पडेगावपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. मात्र या कारवाईत शहरातील गोरगरीब आणि कष्टकरी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांच्या मालमत्तांवर थेट बुलडोझर चालवण्यात आले. याउलट रेल्वेस्टेशन रोड व कांचनवाडी येथील उद्योजक व व्यावसायिकांच्या मालमत्तांवर कारवाई केली नाही. असाच प्रकार गुरुवारी महावीर चौकातही समोर आला.
यात एका शोरूम मालकाला व बिल्डर्ससह एका व्यावसायिकाला अतिक्रमित भाग काढून घेण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला. यावेळात या तिघांनीही न्यायालयात धाव घेतली. यासाठीच त्यांना वेळ देण्यात आला का, असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे गोरगरिबांच्या मालमत्तांवर बुलडोजर चावणाऱ्या महापालिकेने त्यांच्या संसाराचा एकेक कोपरा पाडला. यावेळी चिकलठाणा, कांचनवाडी, आंबेडकरनगरसह अनेक भागांतील कुटुंबांनी प्रशासनाकडे हात जोडून किमान ङ्गसामान काढायला तरी दोन तास द्याङ्घ अशी विनवणी केली. मात्र यावर प्रशासनाचे मन हेलावले नाही. त्यांच्या विनवण्या दडपल्या गेल्या, आणि अश्रूच्या ओघात त्यांच्या हक्काच्या छपराखालील सर्व काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आले.
चिकलठाणा येथील अतिक्रमणावर कारवाई करताना मनपाने एका रुग्णालयाला अवधी न देता त्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी रुग्णवाहिका उभ्या केल्या होत्या. मात्र धनदांडग्यांच्या मालमत्तांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना वेळ दिला जात आहे.
महापालिकेने गुरुवारी सकाळी दहा वाजता महावीर चौकातील बाबा पेट्रोलपंपाची संरक्षक भिंत पाडून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर पथकाने अदालत रोडवर कारवाई केली. पुढे क्रांती चौकानंतर मोंढा नाका भागात कारवाई करून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातील काही मालमत्तांची पाडापाडी केली. मात्र काही भागांत सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कारवाई करणारे पथक सेव्हनहिलकडे पुढे आलेच नाही. त्यामुळे सेव्हनहिल ते सिडको बसस्थानक व एपीआय कार्नरपर्यंतच्या धनदांडग्यांच्या मालमात्तांवरील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रोडवरील अतिक्रमणावर प्रशासनाकडून वेगळाच दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. येथील अनेक व्यावसायिक, धनदांडगे व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून वेळ देण्यात येत असून, ङ्गमुदत मिळतेय, नोटीस मिळतेय, समजावून सांगण्यात येते आहेङ्घ या दुजाभावामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
आम्ही गरीब म्हणून आम्हाला तात्काळ उद्ध्वस्त करता आणि श्रीमंत असल्यावर कायद्याचे वेगवेगळे अर्थ का? असा प्रश्न आता गोरगरिबांकडून विचारला जात आहे. मनपा प्रशासनाचे हे वागणे निषेधार्ह असून, शहरातील नागरिक आता न्यायाच्या शोधात आहेत. कोणीही अतिक्रमणाचे समर्थन करत नाही, पण कारवाई करताना समानतेचा आणि माणुसकीचा न्याय पाळणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. अन्यथा प्रशासनाच्या बुलडोझरखाली भिंतीच नव्हे तर माणुसकीही चिरडली जात असल्याचे वास्तव या कारवाईतुन दिसून येत आहे.