Ellora Traffic | वेरूळच्या वाहतूक व्यवस्थेला नियोजनाची गरज; पर्यटक-भाविकांची गैरसोय टाळण्याची अपेक्षा

घृष्णेश्वर मंदिर परिसरात गर्दी वाढली; रस्त्यालगतच्या पार्किंगमुळे वाहतुकीवर ताण
Verul Traffic Congestion
Verul Traffic Congestion Pudhari
Published on
Updated on

Verul Traffic Congestion

वेरूळ : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे वेरूळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून, काही ठिकाणी वाहनांची गर्दी आणि रस्त्यालगत होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वेरूळ हे पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने वर्षभर देश-विदेशातून पर्यटक तसेच भाविक येथे येत असतात. सध्या श्रावण महिन्यामुळे श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. परिणामी मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून, गर्दीच्या वेळेत वाहतूक संथ होत असल्याचे चित्र आहे.

Verul Traffic Congestion
Sambhajinagar News : काम २ वर्षांपूर्वी झाले, देयकही दिली अन् आता एमबी तपासताय

रस्त्यालगतच्या पार्किंगमुळे कोंडी

रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे उभी केली जाणारी वाहने आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे काही वेळा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. वाहनांच्या रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

उपलब्ध वाहनतळांचा योग्य वापर, रस्त्यावरील पार्किंगला शिस्त लावणे आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच प्रमुख मार्गांवर वाहतूक नियमनासाठी आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Verul Traffic Congestion
Sambhajinagar News : खुलताबाद-म्हैसमाळ रस्त्यावरही वृक्षारोपणात घोळच

कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाची गरज

सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे म्हणाले, “वेरूळ हे महाराष्ट्राच्या पर्यटन आणि धार्मिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक येतात. त्यामुळे गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन होणे अत्यावश्यक आहे. वाहतूक पोलिसांची विशेष व्यवस्था, वाहनतळांचा प्रभावी वापर आणि पार्किंगचे नियोजन केल्यास पर्यटक व भाविकांना मोठा दिलासा मिळू शकतो.”

“वेरूळला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि भाविकाला सुखद अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने केवळ गर्दीच्या काळापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटननगरी म्हणून वेरूळची ओळख अधिक सक्षम करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुटसुटीत आणि शिस्तबद्ध असणे महत्त्वाचे आहे,” असेही लोखंडे यांनी सांगितले.

दरम्यान, वेरूळ लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि परिसरातील अन्य पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन गर्दीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, वाहनतळांचा प्रभावी वापर सुनिश्चित करावा आणि रस्त्यालगतच्या अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news