

Sambhajinagar Crime Nine tolas worth of ornaments stolen from Ganesh Visarjan procession
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरांनी धुमाकूळ घातला. गर्दीचा फायदा घेत पैठणगेट टिळकपथ रस्त्यावर सराफा व्यापाऱ्याची सात तोळ्यांच्या चेनसह तीन महिलांचे मंगळसूत्र चोराने लंपास केले. या घटना शनिवारी (दि.६) रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान घडल्या. तसेच क्रांती चौक हद्दीत १५ ते १६ जणांचे मोबाईल, सिटी चौक भागात ७ ते ८ मोबाईल आणि दोन मंगळसूत्र चोरीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
फिर्यादी हरिदास लालचंद सोनी (७२, रा. समर्थनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे रोकडा हनुमान येथे लालचंद मंगलदास सोनी जेम्स अँड ज्वेलर्स प्रा. लि. नावाची दुकान आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते नातवंडे आणि मुलीसोबत पैठणगेट येथे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते.
टिळकपथ येथे गर्दीमध्ये चोराने त्यांच्या गळ्यातील ३० वर्षे जुनी नऊ रत्नजडित, हिऱ्याचे पदक असलेली ७ तोळ्यांची चेन नकळत कापून लंपास केली. तसेच सुरेखा दिनकर नागरे (रा. न्यू हनुमाननगर) आणि ज्योती तिलक मित्रे (रा. पेठेनगर) यांच्या गळ्यातील प्रत्येकी ७ ग्रॅमची सोन्याची पोत, मीनाबाई सुरेश बन्सवाल (रा. पदमपुरा) यांच्या गळ्यातील ४ ग्रॅमचा सोन्याचा पत्ता चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.
जैन मंदिराकडून घराकडे पायी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार दोघांनी हिसकावली. वृद्धेने पोत धरून ठेवल्याने ७ ग्रॅमच चोरांच्या हाती लागली. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी पावणे आठ ते आठच्या सुमारास गोल्डन केअर हॉस्पिटलजवळ, देशमुख नगर येथे घडली. फिर्यादी मंगला राजकुमार पांडे (६८, रा. सह्याद्री हिल्स, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश उत्सवानिमित्त सुरू असलेल्या टीव्हीसेंटर मैदानावरील आनंदनगरी मेळ्यात चोरांनी धुमाकूळ घालत गुरुवारी (दि.४) पाच महिलांचे दागिने लंपास केले. यामध्ये मनीषा राजू अन्वीकर (३०, रा. सुरेवाडी) यांच्या गळ्यातील ४ ग्रॅमचे मंगळसूत्र, छाया संजय घोडके (५७, रा. रायगडनगर, एन-९) यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, सुजाता संजय सोळंके (रा. श्रीकृष्ण नगर, एन-९) यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, वंदना प्रकाश ठाले (४०, रा. नवजीवन कॉलनी, एन-११) यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र आणि आम्रपाली मनोज ढाले (३८, रा. एन-९) यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅमचे मंगळसूत्र चोरांनी गर्दीत लंपास केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.