

छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून छावा संघटनेच्या एका गटाचे शहराध्यक्ष सचिन पुंडलिक औताडे (३२, रा. हसूल) यांचा गळा चिरून कॅनॉटच्या फ्लॅटवर खून करून मृतदेह गोदावरीत फेकून दिल्याप्रकरणी नगर पोलिसांनी आरोपी भारती रवींद्र दुबे (रा. फ्लॅट नं. २०१, कॅनॉट प्लेस) आणि दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद कान्होबा, ता. खुलताबाद) या दोघांना सोमवारी अटक केली होती.
न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिसरा आरोपी अफरोज खान (रा. कटकटगेट) हा अद्यापही फरार असून, सचिन यांचा गळा चिरलेला चाकू, मृतदेह नेण्यासाठी वापरलेली कार याच्या शोधात शेवगाव पोलिसांचे पथक मंगळवारी (दि.१९) शहरात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सचिन औताडे याचा ३१ जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार हर्मूल पोलिसांत दाखल होती. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी नदीपात्रात त्याचा कुजलेला मृतदेह आढळला. तपासात उघडकीस आले की, सचिन आणि भारती दुबे यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु इतरांशीही संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. ३१ जुलै रोजी कॅनॉट येथील फ्लॅटवर दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दुर्गेश तिवारीही उपस्थित होता. वाद वाढल्यानंतर भारतीने अफरोज खानला बोलावले. तिघांनी मिळून सचिनचा गळा कापून निघृण खून केला. त्यानंतर मृतदेह कारमधून नेऊन नदीत फेकण्यात आला.
नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दिवसांच्या तपासानंतर बुलढाणा येथून आरोपी दुर्गेश तिवारी आणि भारती दुबे यांना अटक केली असून, अफरोज खानचा शोध सुरू आहे. शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक प्रवीण महाले अधिक तपास करीत आहेत.
शेवगाव पोलिसांचे एक पथक शहरात दुपारी दाखल झाले होते. त्यांनी आरोपी भारती दुबेच्या फ्लॅटमध्ये जाऊन पंचनामा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच फ्लॅटमध्ये सचिन यांचा खून करून मृतदेह ताडपत्रीमध्ये गुंडाळून अफरोजच्या कारमधून गोदावरीच्या पुलावर नेऊन पात्रात फेकण्यात आला होता. चाकू, रक्ताने माखलेले कपडे, अन्य कोणी साथीदार आहेत का ? याचा नगर, शेवगाव पोलिस शोध घेत आहेत.