

Retired employees were felicitated at the Municipal Corporation.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सत्कार करून, गुलाब पुष्प देऊन आमच्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण होत नाही. आम्हाला सत्कार नको, तर हक्काचे पैसे वेळेत मिळाले पाहिजेत, अशा भावना बुधवारी (दि.१) महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केल्या.
राज्य सरकारच्या ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार १ ऑक्टोबर हा दिवस बुधवारी महापालिकेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मनपा उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या दालनात गुलाबपुष्प देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणींचा पुन्हा उच्चार केला.
पेन्शन, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय भत्ता, न वापरलेले एलटीसी, तसेच उर्वरित वेतन फरक या बाबींच्या थकबाकीवर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. आमच्याकडून सेवाकाळात मनपा प्रशासन प्रामाणिकपणे काम करून घेत राहिले.
मात्र निवृत्तीनंतर आम्हालाच आमच्या पैशासाठी दारोदार फिरावे लागत असून, ही शोकांतिका आहे. आमचे हक्काचे पैसे मिळाल्यासच आमचा खऱ्या अर्थान सन्मान होईल, असा सूर उपस्थित ज्येष्ठांचा होता. उपायुक्तांच्या दालनात सत्कार करताना माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, विभागाचे रवींद्र खरात आदींची उपस्थिती होती.