

Recruitment for 16 contractual posts in the Municipal Corporation's Health Department despite government ban
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कंत्राटी पद्धतीने थेट पदभरती करू नये, असा शासन आदेश महापालिकेला प्राप्त झाल्यानंतरही आरोग्य विभागाने ६ नर्स आणि १० डॉक्टरांची निवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासनाचा आदेश २३ जुलैला जारी झाला, तर त्याची प्रत महापालिकेला २४ जुलैला मिळाली. त्यानंतर २७ जुलैला सहा नर्स आणि ६ ऑगस्टला दहा डॉक्टरांची निवड करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी अतिरिक्त आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागात एनएचएमअंतर्गत डॉक्टर, नर्ससह विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जात होते. त्यानुसार आरोग्य विभागाने १६ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, ही प्रक्रिया सुरू असतानाच शासनाने २३ जुलैला नवीन आदेश काढून एनएचएमअंतर्गत यापुढे थेट कंत्राटी पद्धतीने पदभरती करू नये, असे स्पष्ट केले.
यासह मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास शासनाने निश्चित केलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजन्सीमार्फतच कर्मचारी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेली कोणतीही खरेदी जिल्हास्तरावर करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची प्रत २४ जुलैला महापालिकेला प्राप्त झाली. प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदेशावर स्वाक्षरी करून तो एनएचएम विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला.
मात्र, आदेशाची माहिती संबंधित विभागाला मिळाली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी, २७ जुलैला सहा नर्सची निवड करण्यात आली. त्यानंतर ६ ऑगस्टला दहा डॉक्टरांची निवड करण्यात आली. या भरती प्रक्रियेबाबत वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने प्रक्रिया स्थगित केली. मात्र, निवड रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतरही भरतीची प्रक्रिया पुढे कशी रेटण्यात आली, याचा तपास आता महापालिका प्रशासन करणार आहे.
तातडीने मागविला चौकशी अहवाल
शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही झालेल्या या निवडीची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
६ पदांसाठी प्रक्रिया
एनएचएमअंतर्गत आरोग्य विभागाने एकूण १६ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये सहा नर्स आणि दहा डॉक्टरांचा समावेश होता. शासनाचा नवीन आदेश महापालिकेला प्राप्त झाल्यानंतरही या पदांवरील निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे ही निवड शासन आदेशाच्या चौकटीत झाली होती की नाही, याचा उलगडा आता चौकशी अहवालातून होणार आहे-