

Recovery of ₹1.5 Crore from Passengers Traveling Without Tickets in a Single Month
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. असे असले तरी फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. एप्रिल महिन्यांत तब्बल दीड कोटीचा दंड वसूल केला आहे. या वर्षभरातील सर्वात दंड वसुलीचा उच्चांक गाठला आहे.
रेल्वेला गर्दी वाढल्याने अनेकदा प्रवाशांना ऐनवळी तिकीट मिळत नाही. तर काही महाभाग जाणूनबुजून विना तिकीट प्रवास करतात. अनेकदा जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करतात. विना तिकीट व आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या अशा प्रवाशांमुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा तिकीट असले तरी विना परवाना लगेज सोबत बाळतात. यावरही या पथकांकडून कारवाई करण्यात येऊन दंड वसूल केला जातो. रेल्वे विभाग नियमितपणे तपासणी मोहीम राबवत असले तरी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे अधिकारीही हैराण झाले आहेत.
दंडासहित दीड कोटीची वसुली
नांदेड विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत एप्रिल महिन्यात दंडाचा उच्चांक गाठत तब्बल १ कोटी ५० लाख रुपये वसूल केले. गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा आकडा सर्वाधिक आहे. मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये १ कोटी ३४ लाख रुपये दंड वसूल केला होता. हा दंड मागील वसुलीपेक्षा १२ टक्के अधिक आहे.
एका दिवसात सात लाख वसूल
२३ एप्रिल रोजी राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत या एकच दिवसांत ७ लाख ९१ हजार इतका दंड वसूल केला आहे. अशी कारवाई यापुढेही केली जाणार असून प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी केले आहे.