

Rains test the Water Resources Department
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे मागील दोन दिवस संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत आधीच पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात जायकवाडीच्या वरच्या भागांतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा येवा येत होता. अशा परिस्थितीत जायकवाडीतील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासोबतच खालच्या भागातील पूरस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी परिश्रम घेण्यात आले. मराठवाडा, नाशिकसोबतच खाली तेलंगणा राज्याच्या अधिकाऱ्यांसोबतच समन्वय ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
अतिपावसामुळे यंदा मराठवाड्यातील सर्वच धरणे ऑगस्ट महिन्यातच तुडुंब भरली. त्यात सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव, लातूर, परभणीसह सर्वच जिल्ह्यांत वारंवार पूर आला. आताही गेल्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नांदेडसह इतरही काही भागांत विशेषतः गोदावरी नदीकाठच्या शहर आणि गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात आधीच शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात दोन शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जायकवाडी धरणात तीन लाख क्युसेकपर्यंत पाण्याचा येवा सुरू झाला. दुसरीकडे येलदरी, माजलगाव, मांजरा, सिद्धेश्वर यासह इतर धरणांमधूनही हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्याची वेळ आली.
त्यामुळे जायकवाडी धरणातून अधिक पाणी सोडल्यास नांदेड आणि गोदाकाठच्या इतर गावांमधील पूरस्थिती आणखी बिघडण्याची चिन्हे होती, तर दुसरीकडे जायकवाडीत येणारे सर्व पाणी सोडणेही कठीण होते. त्यामुळे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस धरणावर ठाण मांडून वेळोवेळी विसर्ग कमी जास्त करून खालची पूरस्थिती आणखी बिघडू नये, तसेच धरणातील साठाही नियंत्रित राहावा यासाठी परिश्रम घेतले.
जायकवाडीतील अतिविसर्गामुळे खालची परिस्थिती बिघडू नये यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनकर, कडाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी धरणावर ठाण मांडून बसले होते. वेळोवेळी हे अधिकारी नाशिक, नांदेड येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विसर्ग कमी अधिक करत होते. नांदेडच्या खाली तेलंगणा राज्यात श्रीरामसागर आहे. तेथील पाणीपातळी कमी न केल्यास मराठवाड्यातून जाणारे पाणी पुढे जाऊ शकणार नाही आणि नांदेडला पुराचा धोका निर्माण होईल ही बाब विचारात घेऊन जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क कायम ठेवला.