

Rains lashed Soygaon taluka: Farmers suffer losses
सोयगाव, पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसाने शुक्रवारी (दि. २४) दुपारी बारा वाजेपासून सोयगाव परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
दुपारनंतर आलेल्या पावसासोबत वाऱ्याचाही जोर असल्याने सोयगाव शहरासह परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मका, कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाजीपाला पिकांवर या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच कापणी केलेले मका व सोयाबीन शेतात साठवून ठेवले होते; परंतु अचानक आलेल्या पावसामुळे हे सर्व पीक भिजून नुकसानग्रस्त झाले आहे.
पाऊस सुरू होताच शेतकरी वर्ग पिकांच्या गंजी झाकण्यासाठी धावपळ करताना दिसला. मात्र वारा व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गंजी उघड्याच राहिल्या ने धान्य ओले झाले आहे. परिणामी मका व सोयाबीनची गुणवत्ता घसरून आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग लागवडीसाठी रोटावेटर मारण्याची तयारी केली होती, परंतु पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पुढील दोन ते चार दिवस तरी मशागतीचे काम होऊ शकणार नाही. यामुळे पेरणी उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहेवादळी. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
कापसाचे नुकसान
सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात शुक्रवार परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी नुकसानीतून थोडाफार शिल्लक असलेला हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.